अधिकार व कायद्याची माहिती असावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:10 AM2018-07-26T01:10:09+5:302018-07-26T01:11:38+5:30
प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्याला आपल्याला राज्य घटनेने दिलेले अधिकार प्राप्त तसेच कायद्याची माहिती असावी, कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, जनजागृतीनेच समाजात गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल व अन्याय, अत्याचार तसेच विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्याला आपल्याला राज्य घटनेने दिलेले अधिकार प्राप्त तसेच कायद्याची माहिती असावी, कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, जनजागृतीनेच समाजात गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल व अन्याय, अत्याचार तसेच विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल, असे प्रतिपादन गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.मेहरे यांनी केले.
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व राष्ट्रीय सेवा योजना तसेच सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक शिवाजी महाविद्यालयात बुधवारी कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर न्यायाधीश बी.एम.पाटील, विधी स्वयंसेवक वर्षा मनवर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.जी.कांबळे, प्राचार्य डॉ.बी.एस.चिकटे आदी उपस्थित होते. यावेळी कांबळे यांनी मुलांची काळजी व संरक्षण कायदा, नवीन मनोधैर्य योजना, पिडीतांसाठीची नुकसानभरपाई योजना, ग्राहक संरक्षण कायदा आदीबाबतची माहिती दिली.
मुली व स्त्रीयांवर होणारे अत्याचार व त्याविरोधात करावयाची तक्रार, बचावात्मक कायदे याबाबतची माहिती वर्षा मनवर यांनी दिली. प्राचार्य डॉ.चिकटे यांनी कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे अध्यक्षीय भाषणातून सांगितले. संचालन जोत्सना सिडाम तर आभार प्रा.ढोमणे यांनी मानले.