दरोडा टाकून पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास

By admin | Published: March 25, 2017 02:14 AM2017-03-25T02:14:58+5:302017-03-25T02:14:58+5:30

धारदार शस्त्रासह दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या व पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या पाच आरोपीस

Rigorous imprisonment for firing on police by throwing a robbery | दरोडा टाकून पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास

दरोडा टाकून पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास

Next

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : भिक्षी माल येथील प्रकरण
गडचिरोली : धारदार शस्त्रासह दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या व पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या पाच आरोपीस सात वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोलीचे न्यायाधीश यु. एम. पदवाड यांनी शुक्रवारी ठोठावली.
२७ सप्टेंबर २०१२ च्या मध्यरात्री चामोर्शी तालुक्यातील भिक्षी माल येथील शंकर सुखदेवराव रॉय यांच्या घरी पाच दरोडेखोरांनी हल्ला करून धारदार शस्त्राचा तसेच बंदुकीचा धाक दाखवून मारझोड केली व रोख दीड लाख रूपये, ७५ हजार रूपयांचे सोन्या चांदीचे दागिणे, मोबाईल फोन लुटून नेले. या प्रकरणी शंकर रॉय यांचा पुतन्या बबलू शंकर रॉय याने दुरध्वनीवरून सदर माहिती चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक प्रफुल्ल वाघ यांना दिली व दरोडेखोर जयनगर मार्गे चामोर्शीकडे येत असल्याचे सांगितले. पोलीस निरिक्षक वाघ यांनी ताबडतोब पोलिसांच्या तीन तुकड्या तयार करून चामोर्शी येथील सरकारी दवाखान्यासमोर नाकेबंदी केली होती. अशातच आरोपी हे दोन मोटार सायकलवर येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी सुध्दा गोळीबार केला. अशातच मोटार सायकलवरून एक आरोपी सोनू गोटा हा खाली पडला व जखमी झाला. पोलिसांनी त्याला जागेवरच पकडले. त्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली. फिर्यादी शंकर रॉय यांच्या घरी झालेल्या दरोड्याची लेखी तक्रार २८ सप्टेंबर २०१२ ला चामोर्शी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सोनू जोगी गोटा रा. बिड्री ता. एटापल्ली, गुड्डू उर्फ संतोष चैतू पुंगाटी, लंकेश्वर सुकरू मट्टामी, उमेश दल्लू नरोटे, मारोती शंकर बारसागडे रा. सर्व इंदिरा नगर एटापल्ली यांच्या विरूध्द भादंविच्या ३९५, ३९८ सह कलम ३/२५, भाहका अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना आॅक्टोबर २०१२ मध्ये अटक केली. सदर प्रकरणात साक्षीदारांतर्फे आरोपींची तुरूंगात कार्यकारी दंडाधिकारीसमोर ओळख परेड घेण्यात आली. तसेच न्यायालयात एकूण १६ साक्षीदारांचे बयान सरकारी पक्षातर्फे नोंदविण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून भादंविच्या कलम ३९५ अन्वये प्रत्येकी पाच वर्ष शिक्षा व ५०० रूपये दंड, भादंविच्या कलम ३९८ अन्वये सात वर्ष शिक्षा व कलम ३/२५ अन्वये एक वर्ष शिक्षा व ५०० रूपये दंड ठोठावण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी केला. दोन्ही प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी काम पाहिले. (जिल्हा प्रतिनिधी)

गोळीबार प्रकरणात आरोपींना वेगळी शिक्षा
आरोपींनी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारासंबंधाने पोलीस उपनिरिक्षक प्रफुल्ल वाघ यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर वेगळे प्रकरण नोंदविण्यात आले. या प्रकरणात सरकारच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रत्येक आरोपीला कलम ३०७ अन्वये सात वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड व इतर सर्व कलमात दोन वर्ष व एक वर्ष शिक्षा ठोठाविण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक आदिनाथ गावळे यांनी केला.

 

Web Title: Rigorous imprisonment for firing on police by throwing a robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.