वाढत्या महागाईने तेल ओतले; सर्वांच्याच घरातले बजेट बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:44 AM2021-09-07T04:44:26+5:302021-09-07T04:44:26+5:30
गडचिराेली : केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ केली. खाद्यतेलासह आवश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वधारल्याने सर्वसामान्य कुटुंबांना संसाराचा ...
गडचिराेली : केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ केली. खाद्यतेलासह आवश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वधारल्याने सर्वसामान्य कुटुंबांना संसाराचा गाडा चालविताना घाम फुटत आहे. वाढत्या महागाईने चांगलेच तेल ओतल्यामुळे घरातले आर्थिक बजेट बिघडले आहे.
विविध प्रकारचे खाद्यतेल, धान्य, शेंगदाणे, साखर, साबुदाणा, चहापत्ती, डाळ तसेच गॅस सिलिंडर, पेट्राेल व डिझेलची दरवाढ अनेकदा झाली. दरवाढीमुळे तीन ते पाच सदस्य असलेल्या कुटुंबांचा महिन्याचा खर्च वाढला. प्रत्येक कुटुंबाचा महिन्याकाठीचा चार ते पाच हजार रुपयांचा खर्च वाढला आहे.
देशात खाद्यतेलाला माेठी मागणी असते. काेणताही पदार्थ बनवायचा झाला तर तेलाशिवाय पर्याय नसताे. तसेच सण-समारंभ तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमांत खाद्यतेल व डाळींचा वापर माेठ्या प्रमाणात केला जाताे. सूर्यफूल, शेंगदाणा, साेयाबीन, पामतेल, जवस आदी खाद्यतेलाचा वापर कुटुंब करीत असतात. याशिवाय दरराेज साखर, चहापत्ती आदींची गरज भासते. या सर्व वस्तूंच्या भावात गेल्या पाच-सहा महिन्याच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वांच्याच खर्चाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी पाच हजार रुपयांत महिनाभराचा किराणा हाेत हाेता. आता तेवढ्याच किराणा साहित्याला एका कुटुंबाला सात हजार रुपये लागत आहेत.
बाॅक्स .....
असे आहेत सद्यस्थितीत दर
सद्यस्थितीत गडचिराेली शहरातील किराणा दुकानांमध्ये शेंगदाणा तेल प्रतिकिलाे १७० रुपये, साेयाबीन तेल १५० रुपये, शेंगदाणे १२० रुपये साखर ४० रुपये, साबुदाणा ८० रुपये किलाे, चहापत्ती ३८० रुपये किलाे दराने विकल्या जात आहे. याशिवाय विविध प्रकारच्या डाळींचेही भाव वधारले आहेत. यामध्ये तूरडाळ १२० रुपये किलाे, उडीदडाळ तसेच मूगडाळ १२० तसेच हरभरा डाळ ८० रुपये किलाे दराने विकली जात आहे. सध्या गॅस सिलिंडरसाठी ९१० रुपये माेजावे लागत आहेत.