वाहतूक ठप्प होण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:59 PM2019-06-30T21:59:08+5:302019-06-30T21:59:30+5:30
ताडगाव-मन्नेराजाराम मार्गावरील इरकुडुम्मे गावात व गावालगत चार पुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरूवात होऊनही पुलांचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : ताडगाव-मन्नेराजाराम मार्गावरील इरकुडुम्मे गावात व गावालगत चार पुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरूवात होऊनही पुलांचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे.
मन्नेराजाराम-डुब्बागुडा गावापर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यातील इरकुडुम्मे गावात दोन पुलांचे बांधकाम तसेच गावापासून अर्ध्या किमी दूर अंतरावर एक पूल व दीड किमी अंतरावर आणखी एक पूल मंजूर करून त्याचे बांधकाम उन्हाळ्यात सुरू करण्यात आले आहे. बांधकाम अतिशय मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळा लागूनही बांधकाम पूर्ण झाले नाही.
पूल बांधकामासाठी रस्त्याच्या मधोमध खड्डा खोदण्यात आला आहे. नागरिक व वाहनांना जाण्यासाठी बाजुने रस्ता तयार करण्यात आला आहे. पावसामुळे बाजुच्या रस्त्यावर चिखल निर्माण होऊन या ठिकाणी वाहने फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडू शकते. विशेष म्हणजे, उन्हाळ्यातच बांधकाम सुरू करून सुध्दा बांधकाम पूर्ण झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंचायत समिती सदस्य इंदरशहा मडावी यांनी या पुलाची पाहणी केली असता, अतिशय चिखल निर्माण झाला असल्याचे दिसून आले आहे. पुलाचे बांधकाम लवकर करावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला योग्य ते निर्देश द्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विद्यार्थ्यांचे वाहन फसले
३० जून रोजी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेले वाहन फसले. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वाहन काढावे लागले. पहिल्या पावसातच अशी दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यानंतर आणखी वाहने फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कलवटांचे काम लवकर करणे आवश्यक झाले आहे.