नदीकिनारी जेवणाची पार्टी ठरली जीवघेणी, दाेघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
By गेापाल लाजुरकर | Published: August 28, 2023 03:51 PM2023-08-28T15:51:45+5:302023-08-28T15:52:55+5:30
चातगाव-खुर्सा नजीकची घटना
गडचिरोली : सात विद्युत कर्मचारी व एक खासगी कामगार नदीपरिसरात जेवणाची पार्टी घेऊन गेले होते. यापैकी खासगी कामगार व एक कर्मचारी असे दोघेजण हातपाय धुण्यासाठी नदीत उतरले असता अचानक खोल पाण्यात बुडाले. ही घटना गडचिरोली तालुक्याच्या खुर्सा (नवेगाव) लगतच्या कठाणी देवटोक घाटावर रविवार २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजता घडली. यापैकी एकाचा मृतदेह सोमवारी दुपारी १ वाजता सापडला तर दुसऱ्याचा दुपारी तीन वाजतापर्यंत शोध लागला नव्हता. चंद्रकांत वसंत ठाकरे (२९) रा. काटली, ता. गडचिरोली, असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चंद्रकांत हा वीज दुरूस्तीची खासगी कामे करीत होता. तर नदीत बुडालेले वीज कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ मिलिंद सीताराम चौधरी (३३) रा. नेरी ता. चिमूर जि.चंद्रपूर यांचा दुपारपर्यंत शोध लागला नव्हता. गडचिरोली तालुक्यातील खुर्सा व धानोरा तालुक्यातील चातगाव या दोन्ही गावांच्या मधून वाहणाऱ्या कंथानी नदीतीरावर महावितरणचे आठ कर्मचारी सकाळी ११ वाजता जेवणाची पार्टी घेऊन गेले होते.
चातगाव-रांगी मार्गावरील चातगावपासून ३ किमी व खुर्सापासूनसुद्धा ३ किमी अंतरावरील कंथानी नदीवरच्या देवटोक घाटावर त्यांनी जेवण केले. त्यानंतर दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास हातपाय धुण्यासाठी व काहीजण आंघोळीसाठी नदीत उतरले. याचवेळी अचानक मिलिंद चौधरी व चंद्रकांत ठाकरे हे दोघेही खोल पाण्यात बुडू लागले. देवटोक घाट खूप खोल असल्याने त्यांना बुडण्यापासून वाचवण्यात सोबत्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु पोलिस सायंकाळपर्यंत पोहोचल्याने शोधमोहीम राबवता आली नाही. त्यानंतर सोमवार २८ ऑगस्ट रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजतापासून शोधमोहीम राबवली असता. चंद्रकांत वसंत ठाकरे यांचा मृतदेह घटनास्थळापासून ५० मीटर अंतरावर सापडला; परंतु चौधरी यांचा शोध दुपारी तीन वाजतापर्यंत लागला नाही.