पावसाळ्यात अडणार २२३ गावांचे मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:07 AM2019-05-30T00:07:07+5:302019-05-30T00:08:01+5:30
पावसाळ्याचे वेध लागताच संभाव्य आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यावर्षीही पावसाळ्यात योग्य रस्त्ये आणि पुलांअभावी २२३ गावांचे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये पुरेसा धान्य पुरवठा आणि औषधीसाठ्यासह आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळ्याचे वेध लागताच संभाव्य आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यावर्षीही पावसाळ्यात योग्य रस्त्ये आणि पुलांअभावी २२३ गावांचे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये पुरेसा धान्य पुरवठा आणि औषधीसाठ्यासह आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे. याशिवाय पूरबाधित होणाऱ्या ४२ गावांना पुराचा वेढा पडल्यास त्यातून गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू सज्ज होत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी १३०० ते १४०० मिमी पाऊस पडतो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पावसामुळे होणारे नुकसानही या जिल्ह्यात जास्त आहे. आधीच बारमाही रस्त्यांचा अभाव, ठेंगणे पूल किंवा अनेक ठिकाणी पूलच नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांमधून पैलतीर गाठणे दुर्गम भागातील नागरिकांना अशक्य होते. अशावेळी त्यांचा इतर प्रमुख गावांशी संपर्क तुटतो. अशा स्थितीत संबंधित गावातील नागरिकांना रेशनचे धान्य किंवा आरोग्य सुविधा गावातच मिळण्यासाठी चार महिन्यांचा साठा गावात पोहचविण्याची व्यवस्था केली जाते.
पावसाळ्यात मार्ग बंद होणाºया गावांमध्ये सर्वाधिक ८२ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ३७ तर अहेरी तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. गेल्यावर्षी पर्लकोटा नदीला अनेक वेळा पूर आल्यामुळे भामरागडमध्ये दोन वेळा नदीचे पाणी शिरले होते. पुलावरून पाणी वाहात असल्याने भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र पर्लकोटावरील पुलाचा प्रश्न अजून निकाली न निघाल्यामुळे यावर्षीही तीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
निवडणूक आचारसंहितेमुळे बेली ब्रिजचे काम पूर्ण न झाल्यामुळे पुलांची स्थिती जैसे थे आहे.
गेल्यावर्षी पुरामुळे १० जणांचा मृत्यू
गेल्या पावसाळ्यात विविध ठिकाणी आलेल्या पुरांनी १० जणांचा बळी घेतला. पुलावरून पाणी वाहत असताना वाहन हाकण्याच्या प्रयत्नात किंवा पायी पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात पुराच्या पाण्यात पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. २०१३ ते २०१८ या सहा वर्षात पुराच्या पाण्यात २५ जण वाहून गेले. तसेच वीज पडून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने गेल्यावर्षी वीज पडून कोणीही दगावले नाही. याशिवाय ६ वर्षात ७७६ जनावरांनाही मृत्यूमुखी पडावे लागले.
पूर परिस्थितीमुळे बाधित होणारी संभावित गावे
गडचिरोली तालुका : शिवणी, कृपाळा, गोविंदपूर, मुलचेरा तालुका : येल्ला, गोमणी, चामोर्शी तालुका : मार्र्कं डादेव, कळमगाव, आष्टी, अनखोडा, आरमोरी तालुका : वघाळा, शिवणी बु., सायगाव, डोंगरसावंगी, वैरागड, देसाईगंज तालुका : देसाईगंज, विसोरा, सावंगी (लाडज), अरततोंडी, किन्हाळा, कुरखेडा तालुका : कुरखेडा, मोहगाव, सायटोला, कुंभीटोला, मालेवाडा, बांधगाव, अहेरी तालुका : वांगेपल्ली, गडअहेरी, गडअहेरी बामणी, चिंचगुंडी, दामरंचा, एटापल्ली तालुका : हिंदूर, हिक्केर, झारेवाडा,
भामरागड तालुका : भामरागड, सिरोंचा तालुका : मृदुकृष्णापूर, मोयाबिनपेठा, दर्शेवाडा, परसेवाडा, अंकिसा, पेडलाया, असरअल्ली, सोमनूर.