रस्ते निर्मितीचा मार्ग मोकळा
By admin | Published: October 21, 2016 01:15 AM2016-10-21T01:15:10+5:302016-10-21T01:15:10+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मागील वर्षीच प्रत्येक जिल्ह्याला रस्ते निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
१५२ किमीचे रस्ते : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना; दुर्गम व नक्षलग्रस्त भागाला प्राधान्य
गडचिरोली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मागील वर्षीच प्रत्येक जिल्ह्याला रस्ते निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र रस्ते निर्मितीसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध न झाल्याने रस्ते निर्मितीचे काम ठप्प पडले होते. यावर्षी मात्र निधी उपलब्ध झाल्याने २०१५-१६ या वर्षातील कामांचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०१६-१७ या वर्षातील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
ग्रामीण व दुर्गम भागात रस्ते निर्मितीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१५ या वर्षापासून सुरू केली. मागील वर्षी जरी या योजनेला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्ष कामांना मात्र सुरुवात झाली नव्हती. २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याला ७७ किमीचे रस्ते निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र मागील वर्षी यातील एकाही कामाला सुरुवात झाली नव्हती. २०१५-१६ मध्ये मंजुरी प्रदान झालेल्या रस्त्यांची कामे यावर्षी करण्यात येत आहेत. २०१५-१६ मध्ये एकूण २० रस्त्यांची कामे आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर १४ कामांचे वर्क आॅडरसुद्धा काढण्यात आले आहेत. दोन कामांची वर्क आॅडर काढण्याचे काम सुरू आहे. चार कामांची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
२०१६-१७ या वर्षातील एकूण मंजूर कामांचे तीन टप्पे पाडण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ७५.०२ किमीचे रस्ते करण्याला महाराष्ट्र शासनाने १ आॅक्टोबर रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सदर मार्ग निर्मितीसाठी अंदाजीत ४७ कोटी ५३ लाख ९३ हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर या मार्गांची पुढील पाच वर्ष देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी ३ कोटी ३१ लाख ६१ हजार रूपयांचा निधी अपेक्षित आहे. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया २४ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात केली जाणार आहे. एकूण १५२ किमी रस्ते येत्या काही दिवसातच होणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
२०१५-१६ मधील कामे
२०१५-१६ या वर्षात निर्मितीसाठी उद्दिष्ट प्राप्त झालेले. मात्र प्रत्यक्षात यावर्षी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये कुरखेडा तालुक्यातील गरगडा-कटंगटोला, वडेगाव ते धुतीटोला, देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर ते उसेगाव, आरमोरी ते शिवणी, धानोरा तालुक्यातील राज्य महामार्ग ते दुधमाळा, निमगाव ते मोहटोला, राज्य महामार्ग ते राजुली, राज्य महामार्ग ते गवळहेटी, गडचिरोली तालुक्यातील नगरी ते पोर्ला, चामोर्शी तालुक्यातील चाकलपेट ते मोहर्ली, कोेनसरी ते जयरामपूर, सिरोंचा तालुक्यातील राज्य महामार्ग ते गर्कापेठा, अहेरी तालुक्यातील उमानूर ते जोगनगुडा, सुधागुडा ते भवासपूर, राज्य महामार्ग ते इटलचेरू टोला, एटापल्ली तालुक्यातील जिल्हा मार्ग ते वासामुंडी, हालेवारा ते कोठी, उडेरा ते मरकल, भामरागड तालुक्यातील राज्य महामार्ग ते कुडकेली, राज्य महामार्ग ते तुमरगुडा या २० मार्गांचा समावेश आहे.