गडचिरोलीतील रस्ते खोदणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:44 PM2019-07-27T23:44:29+5:302019-07-27T23:44:56+5:30
गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने शहरासाठी मंजूर असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश गुजरातमधील कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व, म्हणजे १०२ किलोमीटर लांबीचे रस्ते या गटार लाईनच्या पाईपलाईनसाठी खोदले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने शहरासाठी मंजूर असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश गुजरातमधील कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व, म्हणजे १०२ किलोमीटर लांबीचे रस्ते या गटार लाईनच्या पाईपलाईनसाठी खोदले जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षे शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
शहरातील भूमिगत गटार लाईनचे अंदाजपत्रक ६ वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले होते. त्याला मंजुरीही मिळाली. परंतु हे काम करण्यासाठी बाहेरचे कुणीच कंत्राटदार गडचिरोलीत येण्यास इच्छुक नसल्यामुळे वारंवार निविदा बोलवूनही या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नव्हती. अखेर गुजरातमधील एनआरईपीसी प्रोजेक्ट प्रा.लि.सुरज या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. या कामाची एकूण किंमत ९६.५ कोटी रुपये आहे. मात्र ८३.४४ कोटीत हे कंत्राट सदर कंपनीला मिळाला आहे.
हे काम सदर कंपनीकडून करवून घेण्याची जबाबदारी महाराष्टÑ जीवन प्राधीकरणवर टाकण्यात आली आहे. भूमिगत गटार लाईनसह खोदलेले रस्ते पूर्ववत दुरूस्त करण्याची तसेच नागरिकांच्या घरांपासून मुख्य पाईपलाईनपर्यंत कनेक्शन जोडण्याचीही जबाबदारी या कंपनीवरच राहणार आहे.
रस्त्याच्या मधोमध भूमिगत गटार लाईनचे पाईप टाकले जाणार आहेत. ६०० ते ९०० मिमी (३ फूट) व्यासाचे हे पाईप टाकण्यासाठी रस्ता खोलवर खोदावा लागणार आहे. याशिवाय पाईपलाईनची पातळी (उतार-चढाव) याकडेही बारकारईने लक्ष द्यावे लागणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत त्रास सहन करावा लागणार आहे.
धानोरा-चंद्रपूर मार्गावर रस्त्याच्या कडेला खोदकाम
सध्या धानोरा रोड ते चंद्रपूर रोड या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गाच्या एका बाजुचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन टाकण्यासाठी पूर्ण सिमेंट रस्ता फोडावा लागेल. हे काम खर्चिक असल्यामुळे या मार्गाच्या कडेने भूमिगत गटार लाईन टाकली जाईल. बाकी मार्गावर मात्र रस्त्याच्या मध्येच हे पाईपलाईन राहणार आहे.
किमान तीन वर्षे चालू शकते काम
हे काम पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात हे काम किमान तीन वर्षे चालण्याची शक्यता आहे. १०२ किलोमीटरचे रस्ते खोदून पाईपलाईन टाकणे आणि रस्ते पूर्ववत करणे हे काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांना रहदारीचा त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.