चिचडोह बॅरेजच्या वाहनांनी लावली मार्कंडादेव रस्त्याची वाट
By Admin | Published: August 9, 2015 01:29 AM2015-08-09T01:29:51+5:302015-08-09T01:29:51+5:30
चामोर्शी तालुक्यात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज प्रकल्पाच्या कामावरील शेकडो वाहनांच्या आवागमनामुळे ...
बांधकाम विभाग सुस्त : दुरूस्तीच्या मागणी निवेदनाकडेही दुर्लक्षच
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज प्रकल्पाच्या कामावरील शेकडो वाहनांच्या आवागमनामुळे चामोर्शी ते मार्र्कंडा या रस्त्याची संपूर्ण वाट लागली आहे. या रस्त्याला जड वाहनांमुळे जागोजागी खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे.
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडा तिर्थ क्षेत्रावर वर्षभर शेकडो भाविक विदर्भाच्या तसेच राज्याच्या विविध भागातून येत असतात. त्यांची वाहनेही येथून येते. मागील दोन वर्षांपासून चिचडोह बॅरेज प्रकल्पाच्या कामावरील शेकडो वाहने या रस्त्यावरून माल वाहतूक करीत आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता उखडून गेला आहे. येथून वाहन चालविणेही कठीण झाले आहे. मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टने या बाबत जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच तालुका प्रशासनालाही रस्ता दुरूस्ती करण्याबाबत वेळोवेळी निवेदन दिले. परंतु कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने रस्ता दुरूस्तीच्या कामाबाबत अद्याप दखल घेतलेली नाही. या संपूर्ण रस्त्याच्या दूरावस्थेबाबत चिचडोह बॅरेजच्या कंत्राटदाराकडून दंडात्मक वसुली करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीपूर्वी बांधकाम विभाग या रस्त्याची दुरूस्ती करते. परंतु या रस्त्यावर कंत्राटदारांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक असल्याने दुरूस्त केलेला रस्ताही आता खड्ड्यात रूपांतरित झाला आहे. रस्त्यावर अनेकदा प्रकल्पाच्या कामाची वाहने चिखलात फसल्याच्याही घटना घडल्या आहे. (जिल्हा प्रतिनिधी)