रस्त्याच्या प्रश्नावर राकाँ आंदोलन करणार
By admin | Published: October 5, 2016 02:27 AM2016-10-05T02:27:59+5:302016-10-05T02:27:59+5:30
अहेरी व सिरोंचा आंतर तालुका व तालुक्यातील प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे ही पडले आहेत.
आत्राम यांची माहिती : आलापल्ली-आसरअल्ली मार्गाचे नूतनीकर करा
अहेरी : अहेरी व सिरोंचा आंतर तालुका व तालुक्यातील प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे ही पडले आहेत. अहेरीत उपविभागातील मार्गाचे नुतनीकरण करावे, जिमलगट्टा व देचलीपेठा यांच्यातील दुवा असलेला किष्टापूर नाल्यावर पुलाचे काम त्वरित सुरु करावे, याशिवाय आलापल्ली ते आसरअल्ली मार्गाची दुरूस्ती करून बससेवा सुरू करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला आहे.
आत्राम यांनी म्हटले आहे की, आलापल्ली-सिरोंचा, सिरोंचा-आसरल्ली, अहेरी शहर व आलापल्ली शहर परिसरातील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेकडो लोक या मार्गाने ये-जा करतात. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विविध आजार होत आहे. रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून देचलीपेठामार्गे सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली पर्यंतच्या मार्गावर खूप ठिकाणी नाल्यावर पूल नसल्याने येथील लोकांचा संपर्क नेहमी तुटत असतो. हा पूल नसल्यामुळे सिंदा, जोगणगुडा, देचली, पेठा, मेट्टीगुडम, बिऱ्हाडघाट, करजेली, रमेशगुडम, कोप्पेला व आसरअल्लीपर्यंत मार्ग तयार करावा, म्हणजे जवळजवळ तीन हजार लोकांचा संबंध जुळेल. त्यामुळे येथे पुलांचे बांधकाम होणे गरजेचे आहे.
सोबतच अहेरी उपविभागातील कित्येक पूल क्षतिग्रस्त झालेले आहे. त्याकडे शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. (शहर प्रतिनिधी)
अहेरी उपविभागात राकाँ आक्रमक
शासनाने आलापल्ली ते सिरोंचा व सिरोंचा ते आसरल्ली येथील मार्ग नूतनीकरण करावे व तालुका अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुझवावे क्षतिग्रस्त पूल त्वरित दुरुस्त करावे व किष्टापूर पुलाचे काम त्वरित सुरु करावे अन्यथा धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोठे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जहीर हकीम यांनी दिली आहे.