तेलंगणाचा मार्ग कुलूपबंदच; दोन्ही राज्यातील नागरिकांचा प्रवास थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 01:45 PM2020-10-21T13:45:18+5:302020-10-21T13:45:53+5:30
Gadchiroli News अनलॉकची प्रक्रिया राबविताना केंद्र व राज्य शासनाने आंतरराज्य प्रवासावरील बंधने उठविली आहेत. मात्र गोदावरी नदीवरील मेडीगड्डा बॅरेजच्या पुलाचा गेट तेलंगणा प्रशासनाकडून अजूनही कुलूपबंद ठेवला आहे.
महेश आगुला ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अनलॉकची प्रक्रिया राबविताना केंद्र व राज्य शासनाने आंतरराज्य प्रवासावरील बंधने उठविली आहेत. मात्र गोदावरी नदीवरील मेडीगड्डा बॅरेजच्या पुलाचा गेट तेलंगणा प्रशासनाकडून अजूनही कुलूपबंद ठेवला आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना तेलंगणा राज्यात जाणे कठीण झाले आहे.
महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याची दुभाजक असलेल्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने दोन वर्षांपूर्वी मेडीगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजला जोडून प्रशस्त पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून चारचाकी, दुचाकी वाहने ये-जा करतात. सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिकांचे नातेवाईक तेलंगणा राज्यातील गावांमध्ये आहेत. काही नागरिकांची शेती सुद्धा तेलंगणा राज्यात आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांची सतत ये-जा सुरू राहते.
धोकादायक स्थितीत नागरिकांना बॅरेजवर जाण्यासाठी रोखता यावे, या उद्देशाने पुलावर दोन्ही बाजूला लोखंडी दरवाजा बसविला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा तेलंगणा राज्यात प्रवेश होऊ नये, यासाठी पुलावरील दरवाजा बंद केला होता. केंद्र शासनाने आंतरराज्यीय प्रवासावरील बंधने उठविल्याला आता दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र अजूनपर्यंत तेलंगणा प्रशासनाने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांचा प्रवास थांबला आहे. बॅरेजमुळे गोदावरी नदीत पाणी असल्याने नावेच्या सहाय्याने सुद्धा नदीतून प्रवास करणे कठीण झाले आहे.