तिमरमच्या रस्त्यावर फूटभर चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:04 AM2018-07-22T01:04:14+5:302018-07-22T01:05:09+5:30

अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तिमरम येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण न झाल्याने रस्त्यावर एक ते दीड फूट चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

On the road to Timur, the mud mounts | तिमरमच्या रस्त्यावर फूटभर चिखल

तिमरमच्या रस्त्यावर फूटभर चिखल

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : खडीकरणाअभावी नागरिकांना आवागमनास अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तिमरम येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण न झाल्याने रस्त्यावर एक ते दीड फूट चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
तिमरम येथील रस्त्याची चार ते पाच वर्षांपासून अवस्था बकाल झाली आहे. या समस्येविषयी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सूचित करण्यात आले. परंतु स्थानिक प्रशासनाने समस्या सोडविण्याकडे कानाडोळा केला. सरपंच व सचिवांकडे गावातील नागरिकांनी वेळोवेळी विनंती करून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी दखल घेतली नाही.
विशेष म्हणजे या मार्गाने नागरिक गावातून तसेच शेताकडे ये-जा करीत असतात. परंतु सध्या रस्ता चिखलमय झाला आहे. एक ते दीड फूट चिखल रस्त्यावर पसरलेला असल्याने नागरिकांना चिखल तुडवत मार्ग काढावा लागतो. तिमरम येथे ग्रामपंचायत असतानाही येथील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो. परंतु तो विकास कामांवर खरोखरच खर्च केला जातो काय, असा सवाल करीत सदर मार्गाचे खडीकरण करावे, अशी मागणी नागरिक नरेंद्र सडमेक, रमेश इष्टाम, रूपेश पेंदाम, सरय्या मडावी, नामदेव मडावी, सनू सडमेक, राकेश सडमेक, रवीकिरण कोडापे, खुशाल सिडाम यांनी केली आहे.
आश्वासन हवेत विरले
मागील वर्षी या ठिकाणी गिट्टी व मुरूम टाकण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले होते. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. रस्त्याच्या निर्मितीपासूनच खडीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली असतानाही ग्रामपंचायतीने मागणीकडे कानाडोळा केला.

Web Title: On the road to Timur, the mud mounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.