रेती वाहतुकीने रस्त्याची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:28 AM2017-10-15T01:28:13+5:302017-10-15T01:28:52+5:30
सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला. त्यामुळे सदर ट्रक तिथेच उभा ठेवण्यात आला आहे. परिणामी राजन्नापल्ली मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रेती भरलेल्या ओव्हरलोड ट्रकांच्या वाहतुकीने या रस्त्याची वाट लागली आहे.
रेती भरलेला ट्रक पंक्चर झाल्याने सदर ट्रक शुक्रवारपासून राजन्नापल्ली मार्गावर उभा आहे. शनिवारी या ट्रकची दुरूस्ती सुरू होती. आरडा रेतीघाटावरून रेती वाहतुकीसाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग आरडा गावातून तर दुसरा राजन्नापल्ली गावातून जातो. ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक आरडा गावातील मार्गावरून सर्रासपणे सुरू आहे. या दोन्ही गावातील नागरिकांचा गावातून जड वाहने आवागमनास विरोध आहे. मात्र प्रशासनाच्या बळजबरीने तसेच धाकाने व पोलिसांच्या कारवाईने नागरिकही हतबल आहेत.
आरडा गावातील मार्गावरून डांबरी रस्त्याने ट्रकांद्वारे रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. उखडलेल्या डांबरी मार्गावर कंत्राटदाराकडून मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. आरडा गावातील शाळेसमोरून रेती भरलेल्या ट्रकांचे आवागमन सुरू असते. त्यामुळे शाळेत ये-जा करणाºया विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका होण्याची शक्यताही नाकारताही येत नाही. ट्रकांच्या या आवागमनामुळे आरडा गावात येणारी महामंडळाची बस बंद झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
ट्रकांच्या वाहतुकीमुळे आरडा गावातून शिक्षणासाठी तालुकास्थळी ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. या संदर्भात नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आरडा व राजन्नापल्ली गावातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजी दिसून येत आहे.
अधिकाºयांचे दुर्लक्ष
तालुक्याच्या राजन्नापल्ली व आरडा गावातील मार्गावरून ट्रकांद्वारे रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. त्यामुळे गावातील दोन्ही मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मात्र मार्गाच्या दुरवस्थेकडे तसेच ट्रकांवर कारवाई करण्याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.