राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे रस्ते बनले चकाचक, सर्वत्र रंगरंगोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 10:51 AM2023-07-05T10:51:37+5:302023-07-05T10:53:23+5:30
आज गोंडवाना विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ
गडचिरोली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवारी, ५ जुलै रोजी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकडून राष्ट्रपतींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसलेल्या गडचिरोली-आरमोरी मार्गाचे डांबरीकरण दोन दिवसांपासून सुरू आहे. हा रस्ता चकाचक करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.
शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, आरमोरी मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरील डांबरी रस्ता उखडून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. इंदिरा गांधी चौक ते वनविभाग नाक्यापर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, वाहन चालविणे कठीण झाले आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत होते. अशातच गोंडवाना विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ५ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुस्त असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे.
वर्षभरानंतर बुजविले खड्डे, नागरिकांना दिलासा
मागील वर्षभरापासून कठाणी नदीपुलाजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे खड्डे बुजविण्याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, याकडे संबंधित विभागाने कायम दुर्लक्ष केले. आता राष्ट्रपती जिल्ह्यात येत असल्याने त्या ठिकाणचेही खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी व्हीआयपींनी जिल्हा दौरा करावा, जेणेकरून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.