अतिक्रमणामुळे रस्ते झाले अरूंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:54+5:302021-07-14T04:41:54+5:30
देसाईगंज : शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत वाॅर्डांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने ...
देसाईगंज : शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत वाॅर्डांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. शहरातील काही व्यावसायिक रस्त्यावरच दुकानातील माल ठेवतात. याशिवाय दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने ठेवत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा येताे. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वसतिगृह निर्माण करा
आरमोरी : समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.
मोकाट डुकरांचा हैदोस
गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या आशीर्वादनगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकराच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे आरोग्य धोक्यात आहे.
सिंचन विहिरी ऐवजी बोअर खोदून द्या
रांगी : शासनाच्या मार्फत बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदून देण्यात आल्या आहेत. मात्र, या विहिरींच्या पाण्याची पातळी खोलात गेली आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. या विहिरींना बोअर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
तलावात अतिक्रमण
धानोरा : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जल पातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणामुळे तलाव नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वयोवृद्धांना पेन्शन द्या
चामोर्शी : जिल्ह्यात वयोवृद्ध ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रति महिना ३ हजार रुपये वृद्धापकालीन अर्थसाहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
सिरकाेंडाजवळ पूल बांधा
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अट शिथिल करा
गडचिरोली : गैर आदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.
गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठे चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्य पशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी आहे.