पावसाने शहरातील रस्त्यांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:04 PM2018-07-18T23:04:33+5:302018-07-18T23:04:54+5:30
भ्रमणध्वनी सेवेची भूमिगत केबल लाईन टाकण्यासाठी अनेक मुख्य डांबरी तसेच अंतर्गत रस्ते खोदण्यात आले. मात्र हे रस्ते पालिकेच्या वतीने कसेबसे बुजविण्यात आले. त्यानंतर रविवारच्या रात्रीपासून सोमवारी दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भ्रमणध्वनी सेवेची भूमिगत केबल लाईन टाकण्यासाठी अनेक मुख्य डांबरी तसेच अंतर्गत रस्ते खोदण्यात आले. मात्र हे रस्ते पालिकेच्या वतीने कसेबसे बुजविण्यात आले. त्यानंतर रविवारच्या रात्रीपासून सोमवारी दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहे. अनेक ठिकाणचे डांबर उखडले असून तयार झालेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. अशा खड्डेमय रस्त्यावरून वाहनधारकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता गडचिरोली शहरात बळावली आहे.
गडचिरोली शहराच्या इंदिरा गांधी चौकातून धानोरा, चामोर्शी, मूल व आरमोरी असे चार मुख्य मार्ग जातात. सदर चारही डांबरी मार्ग आहेत. एका खासगी कंपनीच्या वतीने भ्रमणध्वनी सेवेची भूमिगत केबल लाईन टाकण्यासाठी पालिका प्रशासनाकडे लाखो रूपयांची रक्कम भरण्यात आली. या रकमेतून पालिकेने मोबाईल केबल लाईनसाठी खोदलेले खड्डे बुजविले. मात्र अनेक ठिकाणचे खड्डे पुरेशा व योग्य प्रमाणात बुजविण्यात आले नसल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे.
मोबाईल केबल लाईनसाठी खोदलेले खड्डे पालिका प्रशासनाच्या वतीने डांबर तसेच मुरूम टाकून बुजविण्यात आले. मात्र १५ व १६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने खड्ड्यातील डांबर व मुरूम वाहून गेला. परिणामी अनेक मार्गावरील खड्डे पुन्हा जैसे थे झाले. खड्डेमय मार्गावरून वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्ससमोर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणच्या एका मोठ्या खड्ड्यात विद्यार्थ्याच्या वाहनाला अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.
चामोर्शी मार्गावर राधे बिल्डिंग ते शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी डांबर उखडल्याने खड्डे पडले आहेत. याशिवाय आरमोरी, धानोरा व मूल मार्गावरही खड्ड्यांची मालिका दिसून येते. शहरातील तीन ते चार मुख्य मार्गाची तसेच वॉर्डातील अनेक ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मात्र या समस्येकडे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, नगर पालिका जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आता पावसाळा असल्याने मार्गांची दुरूस्ती होण्याची शक्यता नाही.
खड्ड्यात टाकलेली बारीक चुरी धोक्याची
मुसळधार पावसाने डांबरीकरण उखडलेल्या अनेक मार्गावरील खड्ड्यात प्रशासनाच्या वतीने बारीक चुरी टाकली जात आहे. सदर चुरीने खड्डे काही प्रमाणात बुजल्यासारखे वाटत असले तरी खड्ड्यात टाकलेली ही बारीक चुरी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. या चुरीवरून भरधाव वाहने स्लिप होत आहेत. खड्ड्यातील चुरीमुळे प्रसंगी मोठा अपघात शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची चुरी चामोर्शी रोड, पोटेगाव बायपास रोड, शिवाजी महाविद्यालयाकडून रेड्डी गोडाऊनकडे जाणाऱ्या मार्गावर सध्या टाकली जात आहे. पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास खड्ड्यातील चुरी वाहून जाऊन खड्डे पुन्हा जैसे थे होणार आहेत.
शहरातील गोकूलनगर, विवेकानंदनगर, चनकाईनगर, बसेरा कॉलनी, अयोध्यानगर तसेच कारमेल शाळेच्या मागील परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था पावसामुळे झाली आहे. वाहनांच्या दुरवस्थेमुळे अनेक वाहने खराब होत आहेत. सदर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन पालिका व संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.