शहरातील रस्ते पुन्हा खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:12 AM2019-08-03T00:12:58+5:302019-08-03T00:13:32+5:30
गडचिरोली शहरातील मुख्य तसेच वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यांची दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते. मात्र पावसाळा आला की, शहरातील अनेक रस्ते पुन्हा जैसे थे होतात. दरवर्षी येणारा हा अनुभव लक्षात घेऊनही स्थानिक प्रशासन सुस्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य तसेच वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यांची दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते. मात्र पावसाळा आला की, शहरातील अनेक रस्ते पुन्हा जैसे थे होतात. दरवर्षी येणारा हा अनुभव लक्षात घेऊनही स्थानिक प्रशासन सुस्त आहे. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना अनेक वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने शहरवासीयांचा लोकप्रतिनिधींसह प्रशासनावर रोष दिसून येत आहे.
इंदिरा गांधी चौकातून चामोर्शी मार्गाकडे जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. याशिवाय चामोर्शी मार्गावरून रेड्डीगोडाऊन, पोटेगावकडे जाणारा मार्ग तसेच शिवाजी महाविद्यालयाकडून रेड्डी गोडाऊन चौकाला जोडणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी नागरिकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. धक्के खात आवागमन करावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
पाण्यातून काढावी लागतात वाहने
गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाºया अनेक वर्दळीच्या व मुख्य रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. याशिवाय कार्मेल हायस्कूलच्या मागील परिसरात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे येथील वाहनधारकांना पाण्यातूनच आपली वाहने काढावी लागत आहेत. ही बाब गंभीर असताना सुद्धा पालिका प्रशासन प्रचंड सुस्त आहे.