ड्रेनेजसाठी खोदलेले रस्ते ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:31+5:30

गडचिरोली शहरात भूमिगत गटार लाईन टाकण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून भूमिगत गटार लाईनच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळा संपल्यानंतर कामाने गती पकडली. ऑगस्ट ते जानेवारी या पाच महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३५ किमी अंतराची पाईपलाईन टाकून झाली आहे.

Roads excavated for drainage | ड्रेनेजसाठी खोदलेले रस्ते ‘जैसे थे’

ड्रेनेजसाठी खोदलेले रस्ते ‘जैसे थे’

Next
ठळक मुद्दे३५ किमीची पाईपलाईन पूर्ण : रस्ता दुरूस्ती केवळ तीन किलोमीटर, उन्हाळ्यात धूळ तर पावसाळ्यात चिखल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरात गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या भूमिगत गटार लाईनच्या कामामुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहे. गटार लाईनचे काम अतिशय गतीने सुरू असले तरी या कामानंतर रस्त्यांच्या दुरूस्तीकडे मात्र कोणत्याच पदाधिकाऱ्याचे किंवा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत ३५ किलोमीटरचे रस्ते खोदून पाईपलाईन टाकलेली असताना रस्त्यांची दुरूस्ती मात्र जेमतेम ३ किलोमीटर झाली आहे.
गडचिरोली शहरात भूमिगत गटार लाईन टाकण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून भूमिगत गटार लाईनच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळा संपल्यानंतर कामाने गती पकडली. ऑगस्ट ते जानेवारी या पाच महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३५ किमी अंतराची पाईपलाईन टाकून झाली आहे. या भूमिगत गटार लाईनसाठी जेसीबीने रस्ते खोदले आहेत. पाईप टाकण्यासाठी रस्ता अगदी मध्यभागातून खोदला जात आहे. रस्ता खोदतेवेळी माती अस्ताव्यस्त पसरत असल्याने काही डांबरी व सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना कच्च्या रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला होता. आता या रस्त्यांवरून धूळ उडत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास आणखी वाढला आहे.

रस्ते दुरूस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची
पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ८ ते १५ दिवसांनी रस्ता पूर्वी होता तसा, म्हणजे डांबरी रस्ता असेल तर डांबरी आणि सिमेंटचा असल्यास पूर्वीप्रमाणे सिमेंटचा रस्ता तयार करण्याची जबाबदारी सदर कंत्राटदाराची आहे, असे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र कंत्राटदार त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. अनेक रस्त्यांवर रस्ता खोदल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मातीचे ढिग पसरले आहे. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. खोदलेल्या ३५ किमीच्या रस्त्यांपैकी दोन ते तीनच किमी रस्त्यांची दुरूस्ती कंत्राटदाराने केली आहे. या रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट होणार आहे. ज्या गतीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे, त्याच गतीने दुरूस्तीचे कामही करावे, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास खोदलेल्या भागात मोठमोठी वाहने फसण्याचा तसेच चिखलाचा धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Roads excavated for drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.