आसरअल्ली रस्त्यावर मुरूमाऐवजी टाकली रेती
By admin | Published: October 31, 2015 02:22 AM2015-10-31T02:22:56+5:302015-10-31T02:22:56+5:30
जिल्हा परिषदेच्या ३०-५४ योजनेंतर्गत वन विभाग कॉलनी ते पातगट्टा पोचालु यांच्या घरापर्यंत ५०० मीटर लांबी व ३ मीटर रूंदीच्या रस्त्याच्या खडीकरणाचे काम करण्यात आले...
पालकमंत्र्यांकडे तक्रार : वाहन चालविणे झाले कठीण
आसरअल्ली : जिल्हा परिषदेच्या ३०-५४ योजनेंतर्गत वन विभाग कॉलनी ते पातगट्टा पोचालु यांच्या घरापर्यंत ५०० मीटर लांबी व ३ मीटर रूंदीच्या रस्त्याच्या खडीकरणाचे काम करण्यात आले असून या मार्गावर कंत्राटदाराने मुरूम-गिट्टी ऐवजी लाल रंगाची मातीसदृश्य रेती टाकली आहे. यामुळे दुचाकी वाहने व सायकल स्लिप होत असल्याने मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.
३०-५४ निधीतून १५ लाखांचे खडिकरणाचे काम देण्यात आले आहे. या रस्त्याचे खडीकरण डब्बल कोटिंगमध्ये करणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदाराने डब्बल कोटिंगसुद्धा केली नाही. खडीकरणामध्ये सर्वप्रथम गिट्टी टाकून त्यावर मुरूम टाकल्यानंतर त्यावरून रोड रोलर फिरविणे गरजेचे होते. मात्र कंत्राटदाराने रेती व मातीचा वापर केला आहे. रेती सदृश्य माती असल्याने ती चिपकून राहत नाही. त्यामुळे ही संपूर्ण रेती व माती एका पावसातच निघून जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वाहन चालविणे कठीण झाले असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गावातील काही नागरिकांनी या रस्त्याबाबत पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र संबंधित कंत्राटदारावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. या बोगस खडीकरणाची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, त्याचबरोबर रस्त्यावर पसरविलेली माती काढून त्याऐवजी चांगल्या दर्जाच्या मुरूमाचा वापर करावा, अशी मागणी आसरअल्ली गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)