गृह मंत्रालयाची रेल्वे मार्गाबाबतची भूमिका चुकीची
By admin | Published: May 8, 2016 01:18 AM2016-05-08T01:18:40+5:302016-05-08T01:18:40+5:30
केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी निधीचा प्रस्ताव नाकारला आहे.
प्रस्ताव फेटाळला : रवींद्र दरेकर यांचा आरोप
गडचिरोली : केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी निधीचा प्रस्ताव नाकारला आहे. गृहमंत्रालयाची ही भूमिका गडचिरोली जिल्ह्यावर अन्याय करणारी असून याबाबत त्यांनी फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर यांनी केली आहे.
रवींद्र दरेकर यांनी म्हटले आहे की, केंद्रातील युपीए - २ सरकारचे तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर वडसा-गडचिरोली या नक्षलग्रस्त भागातील ४९ किमी लांबीच्या रेल्वे मार्गासाठी गृहमंत्रालयाकडून निधी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. गृह विभागाकडे मोठ्या प्रमाणावर निधी नक्षलग्रस्त भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी येतो. त्यातून हा मार्ग मार्गी लावणे शक्य होते. विद्यमान केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाला निधी देण्याबाबतचा प्रस्ताव फेटाळून गडचिरोली जिल्ह्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग पुन्हा प्रलंबित पडण्याची शक्यता आहे. मारोतराव कोवासे खासदार असताना तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खडगे यांनी या मार्गाच्या कामाला गती दिली होती. गृहमंत्रालयाच्या भूमिकेमुळे आता त्याला खीळ बसण्याची शक्यता आहे