ज्या खोलीत शिक्षण, तेथेच निवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:36 AM2017-08-06T00:36:44+5:302017-08-06T00:37:11+5:30
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या टोकावरील सिरोंचा येथे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय आश्रमशाळा आहे.
नागभुषणम चकिनारपुवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या टोकावरील सिरोंचा येथे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय आश्रमशाळा आहे. पण शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी सुविधाच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. अशा परिस्थितीत विविध सोयीसुविधांसाठी शासनाकडून दिला जाणारा निधी कुठे गायब होतो? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिरोंचा येथील आश्रमशाळेत एकूण १९५ विद्यार्थी पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. कालेश्वरकडे जाणाºया मार्गावर दोन मजली प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे सदर इमारत या मार्गावरून ये-जा करणाºयांचे लक्ष वेधून घेते. दुरून बघितले तर एखाद्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीप्रमाणे सदर इमारत दिसत असून या इमारतीत सर्वच सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात, असा अंदाज येतो. मात्र हा अंदाज प्रत्यक्ष इमारतीत गेल्यानंतर चुकीचा ठरतो. लोकमत प्रतिनिधीने सदर या आश्रमशाळेला भेट देऊन वर्ग, स्वयंपाक गृह व परिसराची पाहणी केली असता, या ठिकाणी सोयीसुविधांचा मोठा अभाव असल्याचे दिसून येते.
शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक असलेल्या सोयीसुविधा येथील विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे वास्तव प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दिसून आले. दुर्गम भागातून आलेले आदिवासी विद्यार्थी असुरक्षित वातावरणात याच वसतिगृहात राहून आश्रमशाळेत शिक्षण घेत असल्याचे दिसून येते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निवासासाठी स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे. मात्र निवासासाठी स्वतंत्र खोली नसल्याने दिवसभर अध्ययन व रात्री त्याच खोलीमध्ये झोपावे लागत असल्याची भयावह वास्तव दिसून येते. विद्यार्थ्यांना डेस्क व बेंच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना फरशीवर बसून दिवसा शिक्षण घ्यावे लागते. तर झोपण्यासाठी बेड नसल्याने त्याच खोलीत फरशीवर झोपावे लागत आहे. या ठिकाणी एकच हातपंप आहे. आंघोळीसाठी पाणी आणण्यासाठी व जेवन झाल्यानंतर ताट धुण्यासाठी या हातपंपावर गर्दी उसळते. आश्रमशाळेचे शिक्षक निवासी राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे बहुतांश आश्रमशाळांमध्ये शिक्षकांसाठी निवासस्थाने आहेत. मात्र सिरोंचा येथील आश्रमशाळेत शिक्षकांसाठी निवासस्थाने नाहीत. येथील शिक्षकांना सिरोंचा येथे भाड्याच्या खोलीत राहावे लागते. परिणामी ते रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही.
संरक्षण भिंतीचा अभाव
सिरोंचा येथील शासकीय आश्रमशाळा कालेश्वर मुख्य मार्गावर आहे. आश्रमशाळा सिरोंचापासून काही दूर अंतरावर आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आश्रमशाळेला संरक्षण भिंत असणे आवश्यक आहे. मात्र येथील आश्रमशाळेला संरक्षण भिंतच नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आहे. मात्र याकडे आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्ष होत आहे. आश्रमशाळेच्या सभोवताल संरक्षण भिंत बांधण्याची मागणी अनेक वेळा सिरोंचा येथील राजकीय पदाधिकाºयांनी केली आहे. मात्र अजूनपर्यंत संरक्षण भिंतीसाठी मंजुरी मिळाली नाही.
टिनाच्या खोलीत स्वयंपाक घर
आश्रमशाळेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचे जेवन तयार केले जाते. सकाळचा नास्ता, दुपारचे व रात्रीचे जेवन तयार केले जात असल्याने स्वयंपाक गृहात रात्रंदिवस काम चालते. त्यामुळे स्वतंत्र स्वयंपाक गृह असणे आवश्यक आहे. मात्र येथे स्वयंपाक गृहासाठी स्वतंत्र खोली नाही. वरून टीन टाकून तात्पुरती खोली तयार केली आहे. पावसाळ्यात पावसाचे फवारे येतात तर उन्हाळ्यात टीन प्रचंड गरम होते.