रॉयल्टी बुक मिळते खुल्या बाजारात
By admin | Published: May 24, 2017 12:30 AM2017-05-24T00:30:38+5:302017-05-24T00:30:38+5:30
तालुक्यातील गौण खनिज तस्करांनी अवैधरितीने रॉयल्टी बूक, वाहतूक परवाना बूक व शिक्के तयार केले आहेत.
देसाईगंजातील प्रकार : तहसीलदाराचे शिक्केही बनविले !
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुक्यातील गौण खनिज तस्करांनी अवैधरितीने रॉयल्टी बूक, वाहतूक परवाना बूक व शिक्के तयार केले आहेत. या बनावट परवान्यांच्या माध्यमातून गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. या सर्व बाबी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना माहित आहेत. मात्र हे सर्व अधिकारी व कर्मचारी मूग गिळून असल्याने सामान्य नागरिक आश्चर्यचकीत झाले आहेत.
रेती, मुरूम, गिट्टी, विटा यांची वाहतूक करण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. रॉयल्टीची रक्कम शासनाकडे जमा केल्यानंतर शासनाकडून संबंधित गौण खनिजाच्या वाहतुकीची परवानगी पावती संबंधित कंत्राटदाराला दिली जाते. या परवानगी पावतीच्या आधारावच वाहनधारकाला वाहतूक करता येते. देसाईगंज तालुक्यातील गौण खनिज तस्करांनी मात्र स्वत:च रॉयल्टी बूक छापून घेतला आहे. त्याचबरोबर वाहतूक परवाना बूक, तहसीलदाराचे शिक्के तयार केले आहेत. या सर्व बाबी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना माहित आहेत. मात्र गौण खनिज तस्करांसोबत महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. खनिज तस्कराला एखाद्या वेळेस पकडले तर त्याच्याकडे रॉयल्टी, वाहतूक परवाना असल्याचा देखावा करून त्याला सोडले जात आहेत.
कुरूड घाटातून रेती तस्करी
देसाईगंज तालुक्यातील कुरूड घाटातून अवैधरित्या रेती तस्करी सुरू असल्याबाबत लोकमतने १६ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर काही दिवस तस्करी थांबली होती. मात्र कोणतीच कारवाई न केल्याने तस्करी पुन्हा सुरू झाली आहे.