सोळा हजार बांधकाम मजुरांना १५०० रुपये, तर नाेंदणी नसलेल्यांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:35 AM2021-04-15T04:35:36+5:302021-04-15T04:35:36+5:30
गडचिराेली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून मजुरांनी माेठ्या प्रमाणात ऑफलाइन नाेंदणी केली. जवळपास ६० हजार मजुरांनी नाेंदणी केली हाेती. परंतु ...
गडचिराेली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून मजुरांनी माेठ्या प्रमाणात ऑफलाइन नाेंदणी केली. जवळपास ६० हजार मजुरांनी नाेंदणी केली हाेती. परंतु दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे, ही बाबत अनेक मजुरांना माहीत नसल्याने काहींची नाेंदणी रद्द झाली. म्हणजेच वैधता संपली. तेव्हा नाेंदणी केलेले मजूर झपाट्याने घटले. वर्षभरापासून कामगारांची ऑनलाइन नाेंदणी सुरू झाली आहे. अनेकजण कॅफे व सेवा केंद्रांमधून नाेंदणी करीत आहेत. गडचिराेली जिल्ह्यात सध्या जुने नूतनीकरण केलेले व नवीन ऑनलाइन नाेंदणी करणारे असे एकूण १६ हजार ५०० बांधकाम मजूर आहेत. १३ एप्रिल राेजी मुख्यमंत्र्यांनी बांधकाम मजुरांसाठी जाहीर केलेल्या प्रत्येकी दीड हजार रुपये मदतीचा लाभ नाेंदणीकृत मजुरांना मिळेल. परंतु नाेंदणीपासून वंचित राहिलेल्या मजुरांना लाभ मिळणार नाही त्या मजुरांचे काय हाेईल, असा सवाल मजूर करीत आहेत.
काय हाल हाेणार कुणास ठाऊक?
शासनाकडून नाेंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. परंतु आमच्या गावातील अनेक मजुरांनी नाेंदणी केली नाही, त्यांना आता याचा लाभ मिळणार नसल्याने त्यांच्यासह मीसुद्धा मदतीपासून वंचित राहणार आहे. शासनाने प्रत्येक मजुराला याेजनेचा लाभ द्यावा.
चंद्रकात महामंडरे,
बांधकाम कामगार म्हणून नाेंदणी करण्यासाठी मी मागील वर्षीच कार्यालयात गेलाे हाेताे; परंतु तेथील गर्दीमुळे नाेंदणी करता आली नाही. त्यानंतर काेराेना लाॅकडाऊन घाेषित झाले तेव्हापासून नाेंदणी करता आली नाही. ऑनलाइन नाेंदणीबाबत आपल्याला फारशी माहिती नाही. त्यामुळे याेजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
विनायक काेडगले
मजुरांना काम केल्याशिवाय कुटुंब चालविता येत नाही. ग्रामीण भागातील मजुरांना याेजनांचीही माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेकजण पात्र असूनही लाभापासून वंचित राहतात. शासनाने बांधकाम मजुरांसाठी मदतीची घाेषणा केली. त्याचा लाभ केवळ नाेंदणीकृत मजुरांनाच मिळणार आहे. तेव्हा नाेंदणी न केलेल्या मजुरांचे १५ दिवस काय हाल हाेणार कुणास ठाऊक.
मंगेश परचाके