चकमकीत मृत नक्षलवाद्यांवर होते १८ लाखांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 09:55 AM2020-10-20T09:55:38+5:302020-10-20T09:56:18+5:30
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सुमन उर्फ झुनकी उर्फ सुलकी बुच्चा पदा (३२ रा. पिपली बुर्गी, ता. एटापल्ली) ही टिपागड दलममध्ये एससीएम सदस्य होती. ही २००६ मध्ये नक्षल चळवळीत भरती झाली. तिच्यावर २१ प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील किसनेली जंगल परिसरात रविवारी झालेल्या चकमकीत चार महिला व एक पुरूष नक्षलवादी ठार झाले. त्यांची ओळख पटली असून त्या सर्वांवर १८ लाखांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सुमन उर्फ झुनकी उर्फ सुलकी बुच्चा पदा (३२ रा. पिपली बुर्गी, ता. एटापल्ली) ही टिपागड दलममध्ये एससीएम सदस्य होती. ही २००६ मध्ये नक्षल चळवळीत भरती झाली. तिच्यावर २१ प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
समिता उर्फ राजो किरको (३४, रा. मुंगनेर, ता. धानोरा) ही २०११ मध्ये ती प्लाटून क्रमांक २० मध्ये भरती झाली होती. तिच्यावर २ खुनासह १४ गंभीर गुन्हे दाखल होते. तिच्यावर ४ लाखांचे बक्षीस होते. कुमली चिपळूराम गावडे (२३, रा. कटेझरी, ता. धानोरा) ही कोरची दलमची सदस्य होती. डीव्हीसी मेंबर सृजनक्काची ती काही दिवस बॉडीगार्ड होती. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. चंदा उर्फ चंदना मासे भालसे (२५, रा. बुडगीन, छत्तीसगड) ही प्लाटून क्रमांक १५ ची सदस्य होती. तिच्यावर ४ लाख रूपयांचे बक्षीस होते. टिरा उर्फ नीलेश दारसू मडावी (३०, रा. चिचोडा ता. धानोरा) हा टिपागड दलमचा सदस्य आहे. त्याच्यावर २० गुन्हे दाखल असून २ लाखांचे बक्षीस होते.