रोहयोवर ८३ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:36 AM2018-01-01T00:36:44+5:302018-01-01T00:37:14+5:30

१ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी ४७ कोटी ६१ लाख रूपये रोहयो मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आले आहेत.

 Rs 83 crores expenditure on ROHOVO | रोहयोवर ८३ कोटींचा खर्च

रोहयोवर ८३ कोटींचा खर्च

Next
ठळक मुद्देअकुशल कामांवर भर : २१ लाख ७७ हजार मनुष्य दिवसांचा रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी ४७ कोटी ६१ लाख रूपये रोहयो मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने शेतीच्या भरवशावरच थोडाफार रोजगार येथील मजुरांना उपलब्ध होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीसुद्धा वर्षभर कसली जात नाही. पावसाळ्याच्या कालावधीत केवळ धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतीच्या भरवशावर केवळ चार महिन्याचा रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर सुमारे आठ महिने कोणताही रोजगार उपलब्ध होत नसल्याने शेतमजूर व अल्पभुधारक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी केली जाते. शेतीचा हंगाम संपल्यानंतर रोहयो कामाची मागणी वाढत असल्याचा दरवर्षीचा अनुभव असल्याने या कालावधीत रोहयो प्रशासनातर्फे कामांचे नियोजन करून ठेवले जाते. कामाची मागणी होताच काम उपलब्ध करून दिले जाते.
१ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामांवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण भागात रोजगाराची समस्या गंभीर असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा रोजगार हमी योजनेचा आहे. त्यामुळे एकूण खर्चाच्या सुमारे ६० टक्के खर्च मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मागील दहा महिन्यात मजुरांच्या मजुरीवर सुमारे ४७ कोटी ६१ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. कामासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे व कुशल कामांवर सुमारे ३१ कोटी २० लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. एकुण खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण ३९.५९ टक्के एवढे आहे. रोहयो प्रशासनावर तीन कोटी ९४ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे रोहयोचे अंदाजपत्रक सुमारे ५२ कोटी २१ लाख रूपयांचे होते. मागील दहा महिन्यांच्या कालावधीत २१ लाख ७७ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आली आहे. तर महिला मजुरांच्या कामाचे प्रमाण ४७.६३ टक्के एवढे आहे. प्रत्येक कुटुंबाला सरासरी ३३.६५ दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सरासरी २०५.६३ रूपये मजुरी
रोजगार हमी योजनेचे काम करताना मजुरी हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. मजुराला त्याच्या कामाप्रमाणे मजुरी मिळाली नाही तर तो त्या कामावर न येता त्याऐवजी दुसरे काम शोधत असतो. रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांना टिकवून ठेवायचे असेल तर त्यांना बाहेरच्या मजुरीच्या तुलनेत जास्त मजुरी मिळणे आवश्यक आहे. रोजगार हमी वरील मजुराला त्याच्या कामानुसार मजुरी दिली जाते. गडचिरोली जिल्ह्यात सरासरी २०५.६३ रूपये एवढी प्रत्येक दिवसाची मजुरी देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील इतर व्यवसायातील मजुरीचे दर बघितले तर रोहयोच्या मजुरीचे दर सर्वसाधारण चांगले असल्याने रोहयोच्या कामास मजूर पसंती देतात.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी
रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध करून देण्यात गडचिरोली जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसून येते. २०१३-१४ या वर्षात रोजगार हमी योजनेवर सुमारे ६२ कोटी ६९ लाख रूपये खर्च करण्यात आले. २०१४-१५ मध्ये ९८ कोटी ४२ लाख, २०१५-१६ मध्ये १३२ कोटी ४७ लाख, २०१६-१७ मध्ये १३६ कोटी १३ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामावर अधिकचा खर्च होत असल्याचे दिसून येते. मजुरांची मजुरी वेळेवर उपलब्ध करून देण्यातही गडचिरोली जिल्हा आघाडीवर आहे. रोहयोच्या नियमानुसार आठवडा संपताच संबंधित मजुराची मजुरी त्याच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे. सुमारे ७१.७ टक्के मजुरी १५ दिवसांच्या आत देण्यात आली आहे.

Web Title:  Rs 83 crores expenditure on ROHOVO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.