आरटीओ इमारत कामाला निधीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:39 AM2017-09-28T00:39:28+5:302017-09-28T00:39:42+5:30

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाºया कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर जागेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे ८० टक्के काम झाले आहे.

 RTO building | आरटीओ इमारत कामाला निधीचे ग्रहण

आरटीओ इमारत कामाला निधीचे ग्रहण

Next
ठळक मुद्दे२० टक्के काम थांबले : साडेचार महिन्यांपासून सव्वादोन कोटींची प्रतीक्षाच

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाºया कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर जागेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे ८० टक्के काम झाले आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून निधीच नसल्याने पुढील उर्वरित २० टक्के काम थांबले आहे. आरटीओ इमारत कामास निधीचे ग्रहण लागले आहे.
आरटीओ कार्यालयाच्या प्रशासकीय कामात गती आणण्याच्या उद्देशाने शासनाने फेबु्रवारी २०१४ मध्ये आरटीओ कार्यालयाच्या नव्या इमारत बांधकामास मंजुरी प्रदान केली. अंदाजपत्रकानुसार या इमारतीच्या कामाची किंमत ६ कोटी १९ लाख ५८ हजार रूपये असून एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यताही शासनाने दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली खासगी कंत्राटदारामार्फत सदर इमारतीचे काम आरक्षित जागेत सुरू करण्यात आले. एप्रिल २०१७ पर्यंत सदर आरक्षित जागेत आरटीओ कार्यालयाची मुख्य इमारत, सायकल/दुचाकी तळ, सुलभ शौचालय, संरक्षण भिंत तसेच प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण झाली आहेत. सदर इमारतीच्या कामासाठी सन २०१४-१५ वर्षात ८५.८१ लाख, २०१५-१६ मध्ये ८६.९६ लाख तसेच २०१६-१७ मध्ये २४७.१२ लाख असा एकूण ४ कोटी १९ लाख ८९ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. हा सर्व निधी इमारतीच्या ८० टक्के कामावर खर्च करण्यात झाला. गेल्या साडेचार ते पाच महिन्यांपासून इमारतीचे विद्युतीकरण, फर्निचर, फायटनिंग, नागरिकांसाठी सुविधा, साईनेजेस, सौरऊर्जा प्रणाली आदी कामे शिल्लक आहेत.
आरटीओ कार्यालयाच्या नव्या प्रशस्त इमारतीचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर सदर इमारतीत आरटीओ कार्यालय स्थानांतरित करण्यात येणार आहे. या नव्या इमारतीत संगणकाची अद्यावत व्यवस्था करण्यात येणार असून नागरिकांना विविध सुविधा देण्यात येणार आहे. सोलर सिस्टिममुळे खंडीत वीज पुरवठ्याची या कार्यालयाच्या कारभारात अडचण जाणवणार नाही. परिणामी जिल्ह्याच्या कानाकोपºयातून येणाºया वाहनधारकांचे काम त्याच दिवशी गतीने होणार आहे.
शिकाऊ वाहनधारकांची चाचणी तोकड्या जागेत
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त बॅरेकमध्ये आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र या ठिकाणी पुरेशी जागा नसल्याने नव्या शिकाऊ परवानाधारकांची चाचणी (ट्रायल) तोकड्या जागेत घेतली जात आहे. सदर चाचणी घेण्यास आरटीओ कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाºयास अडचण जाणवत आहे. याशिवाय कार्यालयात पुरेशा खोल्या नसल्याने कर्मचाºयांसह वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. याबाबीचा विचार करून शासनाने निधी देऊन लवकरात लवकर आरटीओ कार्यालयाची नवी इमारत कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.

कोट्यवधीचा महसूल देणाºया विभागाला निधी देण्यात उदासीनता
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वतीने वर्षभरात हजारो नव्या वाहनांची नोंदणी, वाहन अनुज्ञप्ती तसेच वाहनपरवाना, पुनर्रनोंदणी आदींच्या माध्यमातून कोट्यवधींचा महसूल शासनाकडे पाठविला जातो. शिवाय अवैध वाहतूक, ओव्हरलोड वाहतुकीबाबत सातत्याने कारवाई करून वायूवेग पथकामार्फत लाखोंचा दंड संबंधित वाहनधारकांकडून वसूल केला जातो. एकूणच गडचिरोली आरटीओ कार्यालयामार्फत कोट्यवधींचा महसूल शासनाला मिळत असतो. मात्र आरटीओ कार्यालयाच्या इमारतीसाठी लागणारा २ कोटी ३० लाखांचा निधी देण्यास शासनाची उदासिनता दिसून येत आहे. सदर बाब जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी मांडून उर्वरित कामासाठीचा निधी प्राप्त होण्यास पाठपुरावा करण्याची गरज आहे. अन्यथा आरटीओ कार्यालयाचा कारभार नव्या इमारतीस स्थलांतरित होण्यास अनेक महिन्यांचा कालावधी उलटणार आहे.

Web Title:  RTO building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.