'आरटीओं'चे संकेतस्थळ बंद, वाहन परवाना मिळेना !

By दिलीप दहेलकर | Published: May 20, 2024 03:13 PM2024-05-20T15:13:00+5:302024-05-20T15:13:32+5:30

Gadchiroli : सारथी संकेतस्थळात तांत्रिक अडचणी

'RTO' website closed, vehicle license not available! | 'आरटीओं'चे संकेतस्थळ बंद, वाहन परवाना मिळेना !

'RTO' website closed, vehicle license not available!

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सारथी संकेतस्थळात गुरुवारपासून तांत्रिक अडचण निर्माण झाली असून हे संकेतस्थळ बंद आहे. परिणामी गडचिरोली येथील आरटीओ कार्यालयातून वाहन परवाना देण्याचे काम ठप्प पडले आहे. गुरुवारी व शुक्रवारी वाहन परवाना देण्याचे काम झाले नाही.

तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवारपर्यंत बंद असल्याचा संदेश संकेतस्थळावर आहे. अचानक सारथी बंद पडल्याने परवाना देण्याचे काम ठप्प पडले आहे. वारंवार संकेतस्थळ बंद पडत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

परिवहन विभागाचे संकेतस्थळ बंद असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून उपप्रादेशिक परिवहन विभागाने जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन देण्यावर भर दिला आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना थेट कार्यालयात यावे लागत नाही, असा परिवहन विभागाचा दावा आहे. गुरुवारपासून सारथी संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने 'सारथी' शनिवारपर्यंत बंद राहणार आहे. त्यानंतर रविवारची सुटी आहे. त्यामुळे नागरिकांना परवान्याच्या कामासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 


'सारथी' कधी सुरू तर कधी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडत आहे. अनेकदा दुपारी कामाच्या वेळीच सर्व्हर डाऊन राहत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पेमेंट न होणे, नवीन शिकाऊ, पक्का वाहन परवाना काढणे, परवाना नूतनीकरण, डुप्लिकेट परवाना आदी कामे वेळेत होत नाहीत. आता तांत्रिक बिघाडामुळे सारथीचे सर्वच कामे ठप्प झाली आहेत. सारथी संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी शनिवार, १८ मेपर्यंत बंद राहणार आहे. तसा संदेश एनआयसीने संकेतस्थळावर टाकला असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, मी रजेवर असल्याने मला फारशी माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.


पुन्हा नव्याने घ्यावी लागणार अपॉइंटमेंट
• तांत्रिक बिघाडाची माहिती नागरिकांना नसल्याने त्यांना कार्यालयातून काम न होताच माघारी फिरावे लागल्याने त्याचा आर्थिक भुर्दंडही बसला आहे. वाहन परवाना नूतनीकरणासाठी आलेल्या नागरिकांना आता पुन्हा नव्याने अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.


वाहनधारकांना करावी लागणार प्रतीक्षा
• संकेतस्थळाचे काम शनिवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी कार्यालय उघडले जाईल. संकेतस्थळ सुरू होईपर्यंत वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. काही जणांना याआधी हेलपाटा झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

Web Title: 'RTO' website closed, vehicle license not available!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.