रांगी येथे राष्ट्रसंतांच्या पुतळ्याची केली विटंबना
By admin | Published: August 3, 2015 01:04 AM2015-08-03T01:04:21+5:302015-08-03T01:04:21+5:30
धानोरा तालुक्यातील रांगी ग्राम पंचायत कार्यालयासमोर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारच्या रात्री काही समाजकंटकांनी...
गावकरी संतप्त : घटनेचा केला निषेध; समाजकंटकांवर कारवाईची मागणी
रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी ग्राम पंचायत कार्यालयासमोर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारच्या रात्री काही समाजकंटकांनी दोन्ही हात तोडून विटंबना केली. या घटनेचा रांगीवासीयांनी निषेध केला असून सदर निंदनीय, अशोभनीय व भ्याड कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
रांगी ग्राम पंचायतीच्या मुख्य दरवाजासमोर दोन्ही बाजुला ्रसंत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना २० जून २००६ रोजी करण्यात आली होती. शुक्रवारच्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे हात तोडले. सदर प्रकार सकाळी उघडकीस आल्याने गावकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. काही कालावधीतच पुतळ्याच्या विटंबनेची बातमी संपूर्ण गावभर पसरली. त्यामुळे गावातील नागरिकांनी पुतळास्थळी गर्दी केली होती. दरम्यान रांगीचे सरपंच जगदीश महादेव कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली. यावेळी नरेंद्र भुरसे, शशिकांत साळवे, अर्चना मेश्राम, फालेश्वरी कुमरे, लिला भोयर, वर्षा पदा, श्यामराव बोरसरे, प्रकाश काटेंगे, नुरज हलामी, विश्वनाथ चापडे, प्रा. डी. के. मेश्राम, विलास पदा, नाजुकराव ताडाम आदी उपस्थित होते. गावातील शांतता भंग करण्यासाठी काही समाजविघातकांनी हे कृत्य केले असावे. त्यामुळे गावातील नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन सरपंच जगदीश कन्नाके यांनी यावेळी केले. भ्याड व निंदनीय कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचे नाव मात्र दोन दिवसांचा कालावधी उलटूनही उघडकीस आले नाही. (वार्ताहर)