जिल्ह्यातील ग्रामीण साहित्यिक व साहित्याला राजमान्यताच नाही; विचारवंतांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:14 PM2023-01-25T13:14:07+5:302023-01-25T13:15:05+5:30
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘मराठी साहित्यात गडचिरोली जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान’ या विषयावर एक दिवसीय विशेष व्याख्यानाचे आयोजन
कुरखेडा (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील लेखक-कवी आणि साहित्यिकांनीसुद्धा प्रभावी लेखन करीत कथा, कविता, कादंबरी, नाटकांची निर्मिती केली आहे. मात्र, पुणे-मुंबईचा पगडा असलेल्या या क्षेत्रात दुर्दैवाने येथील साहित्याला अपवाद वगळता राजमान्यताच मिळत नाही, अशी खंत कवी, समीक्षक तथा माजी सनदी अधिकारी प्रभू राजगडकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा संचालनालयाच्या वतीने येथील मुनघाटे महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी (दि. २३) मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘मराठी साहित्यात गडचिरोली जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान’ या विषयावर एक दिवसीय विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रभू राजगडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. किशोर खोपे, भाषा संचालनालय विभागाचे प्रतिनिधी भाषातज्ज्ञ हरेश सूर्यवंशी, भाषांतर तज्ज्ञ स्नेहा पुनसे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी हरेश सूर्यवंशी व स्नेहा पुनसे यांनी मराठी भाषा संचालनालयाच्या मराठी विभागाच्या कार्याची ओळख व संवर्धनाकरिता होत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
प्रास्ताविकातून डॉ. नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व राज्यात १४ ते २८ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नियोजित उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमलता उराडे यांनी केले.
दुर्लक्षित साहित्याला सूचीबद्ध करणार
प्राचार्य मुनघाटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्ह्यात मोठ्या संख्येने लेखक व त्यांनी निर्मिती केलेले साहित्य आहे, मात्र परिस्थिती व राजाश्रय नसल्याने त्यांची प्रसिद्धी होऊ शकली नाही. हे दुर्लक्षित असलेले लेखक व त्यांचे साहित्य मुनघाटे महाविद्यालयाचा वतीने सूचीबद्ध करीत ते पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिले.
ग्रामीण मराठीला हिणवू नका
यावेळी मार्गदर्शन करताना राजगडकर म्हणाले, मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाने केले आहे. त्यामुळे शासनाने भाषा संवर्धनाचा उपक्रम राबविताना ग्रामीण भागात विशेष मोहिमेची आखणी करावी. ग्रामीण मराठीला गावरान मराठी म्हणून न हिणवता येथील साहित्यालाही राजमान्यता प्रदान करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली. जिल्ह्यातील लेखक व त्यांचे साहित्य यांची एक लांबलचक यादीच त्यांनी वाचून दाखविली.