शांती मार्च, बंदुका सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:49 AM2017-07-29T00:49:28+5:302017-07-29T00:50:00+5:30
नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही भागात गुरूवारी नागरिकांनी पोलिसांच्या पुढाकाराने शांती मार्च काढून नक्षल बंदचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही भागात गुरूवारी नागरिकांनी पोलिसांच्या पुढाकाराने शांती मार्च काढून नक्षल बंदचा निषेध केला. तर काही ठिकाणी आणखी भरमार बंदुका पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आल्या. शुक्रवारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कोणतीही हिंसक घटना घडली नसली तरी ग्रामीण भागात दहशतीची छाया दिसत आहे.
धानोरा येथे पोलिसांनी जनमैत्री मेळावा घेतला. त्यात विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी नक्षलवाद धुडकावून लावत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यातूनच शांती मार्च काढण्यात आला. त्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते. कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथील प्रभारी अधिकारी पोउनि अजित कणसे, दुय्यम प्र.अधिकारी दीपक वारे, रामदास जाधव तसेच कर्मचाºयांनी ग्रामभेटी आणि अभियानादरम्यान भरमार बंदुका जमा करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्याला प्रतिसाद देत तळेगाव, खांबाडा (ता.धानोरा) या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील ग्रामस्थांनी १ डबल बोअर रायफल, ३ भरमार बंदुका व ३ भरमार बंदुकांचे बॅरल स्वत:हून आणून जमा केले आणि नक्षल शहीद सप्ताहाला विरोध दर्शवला.
यापूर्वी मालेवाडा हद्दीतील गावकºयांंनी ६ भरमार बंदुका व ४ भरमार बॅरल जमा केले होते. मालेवाडा हद्दीत ठिकठिकाणी मिळालेल्या नक्षल विरोधी पत्रकांद्वारेही आदिवासी जनतेने आपला निषेध नोंदविला आहे.
विशेष म्हणजे नक्षल्यांचे बॅनर जाळणे किंवा त्यांच्या मनसुब्यांना विरोध दशविणारे प्रतिबॅनर लावणे असे प्रकार जिल्ह्यात पहिल्यांदाच घडत आहेत. त्यामुळे नागरिक नक्षल्यांच्या दहशतीच्या जीवनाला कंटाळले असून त्यांना इतरांप्रमाणे भयमुक्त वातावरणात जगायचे आहे, असा अर्थ पोलिसांकडून लावल्या जात आहे.