दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 12:37 PM2023-06-03T12:37:57+5:302023-06-03T12:45:56+5:30
दहावीत चामोर्शीतील दोन विद्यार्थी जिल्ह्यात टॉपर : दोघांनाही समान गुण
लोमेश बुरांडे
चामोर्शी (गडचिरोली) : प्रयत्नाला जिद्दीची जोड दिली की प्रतिकूल परिस्थितीतही यशाला गवसणी घालता येऊ शकते. येथील साची रमेश सोमनकर या विद्यार्थिनीने सहा तास अभ्यास करून दहावी परीक्षेत ९६.६० टक्के गुणांसह अव्वल क्रमांक मिळवत दूधविक्रेत्या पित्याचे पांग फेडले. साची टॉपर आल्याची बातमी कळाल्यावर वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
साची शहरातील डिस्नीलँड ॲड. प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे. रमेश चरणदास सोमनकर हे चामोर्शीच्या प्रभाग क्र. ८ येथील गव्हारपुरा येथे वास्तव्यास आहेत. साची ही त्यांची कन्या. आई गृहिणी असून रमेश यांना जेमतेम तीन एकर शेती आहे. रमेश यांच्याकडे सात म्हशी आहेत. शेतीच्या जोडीला ते दुग्धव्यवसाय करतात. घरोघर दूध विक्री करून मिळालेल्या पैशातून त्यांच्या संसाराचा गाडा चालतो. नियमित सहा तास तिने घरीच अभ्यास केला, तर काही दिवस शिकवणीलाही गेली. अशा पद्धतीने सर्व विषयांची तयारी करून साचीने तालुक्यात अव्वलस्थान पटकावून यशाला गवसणी घातली.
तिला आयआयटी करून इस्त्रोमध्ये संशोधन करायचे आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या साचीचा शाळेतील सर्व उपक्रमांत हिरिरीने सहभाग होता. आई- वडिलांचे पाठबळ, प्राचार्य जे. विलास, गुरुदेव सातपुते व शिक्षकांमुळे हे यश शक्य झाल्याचे सांगायला ती विसरली नाही. तिच्या यशाने आई- वडील भारावून गेले. साचीने घवघवीत यश संपादन केल्याने कष्टाचे चिज झाल्याची प्रतिक्रिया वडील रमेश सोमनकर यांनी व्यक्त केली.
भावाच्या पावलावर पाऊल
साचीचा भाऊ मृणाल हा सध्या पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. त्याने तीन वर्षांपूर्वी दहावीत तालुक्यात अव्वलस्थान पटकावले होते, तर बारावीत विशेष प्रावीण्य मिळवले होते. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत साचीनेही दहावीत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला.
'कारमेल'चा दबदबा, नावाप्रमाणेच 'प्रिन्स'
चामोर्शी येथील कारमेल अकॅडमी येथे शिकत असलेला घोट येथील प्रिन्स रवींद्र वडेट्टीवार याला ९६.६० टक्के गुण मिळाले असून, तो जिल्ह्यातून प्रथम आला आहे. तो मूळचा घोट येथील आहे. शाळेच्या बसने तो चामोर्शी ते घोटला जा-ये करत होता. त्याने कोणत्याही विषयाचे ट्यूशन लावले नव्हते. शिक्षकांनी दिलेला अभ्यास तेवढा तो नियमित करायचा. दरदिवशी जवळपास सहा तास अभ्यास करत होता. अभ्यासात त्याने सातत्य ठेवले होते. त्याला आयआयटीमधून इंजिनिअरिंग करायचे आहे.