शहीद पोलिसांचे बलिदान सदैव स्मरणात राहील
By admin | Published: October 22, 2016 02:00 AM2016-10-22T02:00:23+5:302016-10-22T02:00:23+5:30
नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, जवान सातत्याने प्रयत्नशील आहेत.
अभिनव देशमुख : शहीद पोलीस जवानांना आदरांजली
गडचिरोली : नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, जवान सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र नक्षल्यांशी जंगलात मुकाबला करताना काही पोलीस अधिकारी व जवान शहीद झाले. अशा शहीद पोलीस अधिकारी व जवानांचे बलिदान कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
शुक्रवारी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस हुतात्मा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, पोलीस अधीक्षक गृह गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील आदी उपस्थित होते. १ सप्टेंबर २०१५ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत संपूर्ण भारतात पोलीस दलातील एकूण ४७३ अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावित असताना शहीद झाले. त्यांच्या नावाचे वाचन यावेळी करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात चालू वर्षात शहीद झालेले पोलीस शिपाई दीपक मुकूंदा सडमाके, पोलीस हवालदार नानाजी नागोसे व पोलीस शिपाई बंडू घिसू वाचामी या वीर जवानांना पोलीस पथकाद्वारे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. काही अडचण भासल्यास संपर्क करा, असे आवाहन केले. शहीद कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व पोलीस अधिकारी सहभागी आहोत, असे त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी, शहीद पोलिसांचे कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)