नाक्याअभावी सागवानाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:00 AM2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:28+5:30
वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील मुधोलीजवळ वैनगंगा नदीवर राज्य शासनाने पूल बांधले आहे. या पुलावर वनविभागाचा नाका नसल्याने मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडांची तस्करी गोंडपिपरी, बल्लारशाहकडे होत आहे. या ठिकाणी वनविभागाचा तपासणी नाका असणे आवश्यक आहे.
वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन वैनगंगा नदीवर जयरामपूर परिसरात पुलाला मंजुरी दिली. तीन वर्षात पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. सदर पूल चंद्रपूूर जिल्ह्यातील घाटकूळ या गावाला जोडते. पुढे या मार्गाने गोंडपिपरीकडे जाता येते. या पुलाने परिसरातील नागरिकांसाठी प्रगतीची दारे खुली केली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सागवान मौल्यवान असल्याने या सागवानाला राष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आष्टीजवळील पुलावरूनही गोंडपिपरीकडे जाता येते. मात्र या पुलावर वनविभागाचा नाका असल्याने सागवान तस्करी करणाऱ्यांवर वचक आहे. त्यामुळे तस्करांनी मुधोली पुलाचा उपयोग करण्यास सुरूवात केली आहे. वाहनांना अटकाव होत नसल्याने वाहनातून सागवानाची तस्करी होत आहे. काही तस्कर कापसाच्या खाली सागवानी लठ्ठे टाकून तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी वनविभागाचा नाका उभारण्याची मागणी होत आहे.
पुलाने उघडली प्रगतीची दारे
जयरामपूर परिसरात अनेक गावे आहेत. सदर गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसली आहेत. येथील जमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी मिरची, भाजीपाला, कापूस, धान आदी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र या शेतकऱ्यांना गावापासून २५ किमी अंतरावर असलेल्या चामोर्शीशिवाय पर्याय नव्हता. १० किमी अंतरावर गोंडपिपरी हे तालुकास्थळ आहे. गोंडपिपरी येथे कापूस, भाजीपाला, मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. मात्र नदीवर पूल नसल्याने येथील शेतकºयांसमोर पर्याय नव्हता. शासनाने पूल बांधल्यानंतर आता या परिसरातील शेतकºयांसाठी प्रगतीची दारे खुली आहेत. येथील बहुतांश शेतमाल गोंडपिपरी, बल्लारशाह येथील बाजारपेठेत नेला जात आहे. त्यामुळे चांगला भाव शेतमालाला मिळत आहे.