सागवान नही, ये तो सोना है... आलापल्लीच्या सागवानाची साऱ्या जगाला भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 02:22 PM2023-03-31T14:22:44+5:302023-03-31T14:23:12+5:30
अयोध्येतील राम मंदिराची वाढणार शोभा : जंगलात आढळतात दुर्मीळ प्रजातीची लाकडे
गोपाल लाजूरकर/ प्रशांत थेपाले
गडचिराेली/आलापल्ली : राज्यात वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिराेलीतील वनक्षेत्र नेहमीच पर्यटकांना खुणावते; परंतु नक्षली समस्येमुळे येथील पर्यटनाला वाव मिळाला नाही. मात्र, अस्सल नैसर्गिक वनसंपदा असलेल्या लाकडाला वेळाेवेळी मागणी राहिली. आतासुद्धा ही मागणी आहे. येथील सागवन प्रभू रामचंद्राच्या अयाेध्येतील द्वार सजवणार आहे; परंतु बाहेरून येथील सागवनाला आलेली ही पहिलीच मागणी नाही तर यापूर्वीही अनेक राज्यांना येथील मजबूत सागवनाचा तांबूसपणा खुणावला.
गडचिराेली जिल्ह्यात सागवनासह येन, बीजा, खैर, बेहडा, आंजन, माेहा आदींसह विविध प्रजातींची झाडे आहेत. या लाकडांचा इमारती लाकूड म्हणून उपयाेग केला जाताे. मात्र शाेभेच्या वस्तू, इमारतीसाठी तसेच भाैतिक सुविधेच्या वस्तूंसाठी सागवानाला सर्वाधिक मागणी आहे. गडचिराेली जिल्ह्यात सर्वत्र सागवान आढळत असले तरी दक्षिण भागातील आलापल्ली, भामरागड व सिराेंचा आदी वनविभागात सागवानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही आलापल्ली वनविभागातली सागवान उच्च दर्जाचे आहे. लाकूड नव्हे तर जिवंत साेन्याप्रमाणे येथील सागवानाला मागणी आहे.
५१ काेटींच्या लाकडाने सजली संसद
गडचिराेली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील उच्च दर्जाचे सागवान लाकूड परराज्यात तर पाेहाेचलेच; परंतु देशाच्या राजधानीतील संसदेतही पाेहाेचले. संसदेत विविध प्रकारचे लाकूडकाम करण्याकरिता १ काेटी १२ लाख ३८ हजार २१६ रुपयांचे चिराण सागवान, तर ५० काेटी रुपयांचे ५०० घनमीटर गाेल लाकूड असे एकूण ५१ काेटींवर किमतीचे सागवान आलापल्लीतून गेले.
परराज्यातही शासकीय कामात वापर
गडचिराेली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील विशेषत: आलापल्ली येथील सागवान केरळ, कर्नाटक, बिहार तसेच उत्तर व दक्षिण भागातील राज्यांमध्ये शासनाच्या विविध कामांकरिता पुरविण्यात आले. सदर सागवानाचा वापर शासकीय कार्यालयांमध्ये लाकूड कामाकरिता करण्यात आला.
इंग्लंडच्या राजवाड्यातही पाेहाेचले सागवान
देशात ब्रिटिशांची राजवट असताना स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादमार्गे तत्कालीन सिराेंचा जिल्ह्यातून ब्रिटिश अधिकारी गडचिराेली जिल्ह्यात दाखल हाेत असत. याचवेळी त्यांना आलापल्लीतील सागवानाने खुणावले. त्यानंतर त्यांनी येथील सागवान ब्रिटिश राज्याच्या महालात लाकूडकामासाठी वापरले, असे जुने जाणकार सांगतात.
वैशिष्ट्ये काेणती?
आलापल्लीसह सिराेंचा व भामरागड वनविभागातील सागवान उच्च दर्जाचे आहे. सागवानाचा रंग गर्द तांबूस असून ताे लक्षवेधक आहे. तसेच सागवान मजबूत असून फिनिशिंगनंतर अत्याधिक गुळगुळीत व चकचकीतपणा येथील सागवानाला येताे. याच गुणधर्मामुळे उत्कृष्ट इमारती लाकूड म्हणून येथील सागवानाला माेठ्या प्रमाणात मागणी असते.
आलापल्लीचे वनवैभव
आलापल्ली येथे आजही सर्वात माेठी सागवान झाडे आहेत. याशिवाय येथे ब्रिटिशकाळात १९१० मध्ये बांधलेले रेस्ट हाऊस आहे. या रेस्ट हाऊसच्या जाडसर भिंती पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. तसेच येथे जुनी क्रकचालय (साॅ मिल) आहे. त्या आता बंद अवस्थेत असल्या तरी शासनाने नवीन साॅमिल येथे उभारल्या.
गडचिराेली जिल्ह्यात सागवानासाठी वातावरण अत्यंत चांगले आहे. शुष्क वातावरणातच सागवानाची वाढ जाेमदार हाेते. या झाडाच्या वाढीसाठी अधिक ओलावा लागत नाही. जिल्ह्याच्या दक्षिण भागात सागवानासाठी पाेषक वातावरण असल्याने अन्य भागाच्या तुलनेत येथील सागाची झाडे उंच वाढतात. त्यांना फाटे कमी येतात.
- प्रा. डाॅ. वसंता कहालकर, वनस्पतीशास्त्र, म. गांधी महा. आरमाेरी