केंद्र शासनावर संतांची नाराजी
By admin | Published: December 30, 2016 02:24 AM2016-12-30T02:24:49+5:302016-12-30T02:24:49+5:30
देशात सत्ताबदल झाल्यानंतर गोरक्षा, राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी अपेक्षा होती.
‘अच्छे दिन’ची अनुभूतीच नाही : ‘विहिंप’च्या मंचावरून गोविंदगिरी महाराजांनी टोचले कान
नागपूर : देशात सत्ताबदल झाल्यानंतर गोरक्षा, राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतीत कुठलेही अनुकूल वातावरण दिसून येत नाही. देशात ‘अच्छे दिन’ आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अनुभूती कुठेही येत नाही, या शब्दांत स्वामी मंगलगिरी आश्रमचे स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले आहे. विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या मंचावरून त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
गुरुवारपासून नागपुरातील माँ उमिया धाम येथे ‘विहिंप’च्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला सुरुवात झाली. उद्घाटन सत्राला उपस्थित अडीचशेहून अधिक प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना गोविंदगिरी महाराजांनी केंद्राच्या धोरणांवर असमाधानी असल्याचे सांगितले. गोरक्षा व राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाही. आपल्या विचारांचे शासन सत्तेत आल्यावर बऱ्याच समस्या दूर होतील, असे वाटत होते. परंतु असे पूर्णपणे झालेले नाही. संस्कृतसारखी देशाची भाषा दुर्लक्षितच आहे, असे ते म्हणाले. यावेळी संघ परिवारातील समन्वयावरदेखील भाष्य केले. ‘विहिंप’कडून हिंदू समाजाला एकत्र बांधण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे संघाकडूनदेखील धर्मजागरण विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. अशास्थितीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे समन्वयावर जास्तीतजास्त भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
विहिंपने तयार केला देशव्यापी हिंदू सुरक्षा
कृती आराखडा
देशातील अनेक ठिकाणी हिंदू समाजावरील हल्ले वाढले आहे. हिंदू समाज या देशातच असुरक्षित असल्याचे दिसून येत असून, त्यांच्या सुरक्षेसाठी ‘विहिंप’तर्फे देशव्यापी हिंदू सुरक्षा कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी यासाठी चतु:सूत्री तयार करण्यात आली आहे. राममंदिराची निर्मिती ही ठरलेल्या प्रारूपानुसार रामजन्मभूमी न्यासकडूनच होईल, तसेच मंदिराची एक इंच जागाही कुणाला देणार नाही. आहे त्याच जागेवर मंदिर तयार करण्यात येईल. यासंदर्भात संसदेत कायदादेखील बनविण्यात यावा, अशी मागणी यावेळी तोगडिया यांनी केली.