प्रभावी दारूबंदीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:46+5:302021-07-13T04:08:46+5:30
दारूचे दुष्परिणाम लक्षात घेता विविध संघटना, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन छेडून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली ...
दारूचे दुष्परिणाम लक्षात घेता विविध संघटना, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन छेडून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांचा त्रास कमी झाला होता. भांडण-तंट्यांचे प्रमाण घटले होते. मात्र, काही राजकीय नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्याचा अट्टाहास धरून दारूबंदी उठवली. महसुलाचा मुद्दा पुढे करून दारूबंदी उठविल्यामुळे फक्त शासनाचा व मूठभर दारू विक्रेत्यांचाच फायदा झाला. मात्र, जनतेचे काय, असा विचार राज्य शासनाने न करताच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात कोरची तालुक्यातील ७९ गावांनी पुढाकार घेत निषेध ठराव घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे, तसेच चोरट्या मार्गाने अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास गाव संघटन सहकार्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूची अवैध वाहतूक होईल. परिणामी या निर्णयाचा धक्का गडचिरोली जिल्ह्यालादेखील बसणार आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील ७९ गावांनी ठराव घेत गाव संघटनेच्या निवडक प्रतिनिधींच्या हस्ते तहसीलदार भंडारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.