सखी मंच ही महिलांच्या प्रगतीची चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:39 PM2018-02-17T23:39:25+5:302018-02-17T23:40:01+5:30

लोकमत समुहातर्फे चालविल्या जाणाऱ्या सखी मंचच्या महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात हजारो शाखा असून संपूर्ण महाराष्ट्रात २५ लाख सदस्य आहेत. लोकमत हे वृत्तपत्र नसून एक चळवळ आहे.

Sakhi Forum is the women's progress movement | सखी मंच ही महिलांच्या प्रगतीची चळवळ

सखी मंच ही महिलांच्या प्रगतीची चळवळ

Next
ठळक मुद्देखासदारांचे गौरवोद्गार : सखी व बाल महोत्सवाचे थाटात उद्घाटन

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : लोकमत समुहातर्फे चालविल्या जाणाऱ्या सखी मंचच्या महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात हजारो शाखा असून संपूर्ण महाराष्ट्रात २५ लाख सदस्य आहेत. लोकमत हे वृत्तपत्र नसून एक चळवळ आहे. स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी लावलेल्या लहानशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. महिलांच्या कला कौशल्याला वाव देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या उद्देशाने लोकमत समुहाने सखीमंचच्या माध्यमातून उभारलेली ही महिलांची चळवळ त्यांच्या प्रगतीच्या वाटा निश्चितच रूंदावेल, अशी आशा खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली.
लोकमत सखी मंच व बाल विकास मंचच्या वतीने स्थानिक पटेल मंगल कार्यालयात आयोजित सखी व बाल महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी थाटात पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाभरातील कलावंत सखींच्या उपस्थितीत झालेल्या या महोत्सवाच्या शानदार सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा डोळस, तसेच लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, सखीमंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, बालमंचच्या संयोजिका किरण पवार आदी मंचावर उपस्थित होते.
स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा व सखीमंचच्या संस्थापक अध्यक्ष स्व.ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वालन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. पुढे बोलताना खा.अशोक नेते म्हणाले, पूर्वीच्या काळात महिला चूल व मूल यामध्येच गुरफटून राहत होत्या. मात्र काळाच्या ओघात महिलांनी आता सर्वच क्षेत्रात प्रगती साधली आहे. महिलांचे सक्षमीकरण आणखी वाढले पाहिजे. लोकमतने सखीमंचच्या माध्यमातून उभारलेल्या चळवळीतून महिलांच्या सक्षमीकरणास मोठा वाव मिळत आहे. महिलांनी पुन्हा जागरूक होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, लोकमत समूह व माझ्या कुटुंबियांमध्ये फार जुने ऋणानुबंध आहेत. लोकमत सखीमंचच्या गडचिरोली जिल्ह्यात १४ शाखा असून पाच हजारांवर सदस्य आहेत. महिलांना सन्मानाचे स्थान देऊन त्यांच्या कला कौशल्याला वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लोकमत समुहाने कायम ठेवले आहे. नारीशक्तीचा सर्वांगिण विकास होण्यासाठी लोकमतचे हे योगदान मोठे आहे, असे पोरेड्डीवार म्हणाले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या रेखा डोळस यांनीही लोकमत समुहाच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, संचालन प्रिया साळवे यांनी केले तर आभार बालमंचच्या संयोजिका किरण पवार यांनी मानले.
तालुकास्तरावरही सखी मेळावे व्हावेत
महिला व बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत समुहाने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे. लोकमतच्या उपक्रमातून महिलांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येत आहेत. जिल्हास्तरावरील महोत्सवासारखे तालुकास्तरावर लोकमतने कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी व्यक्त केली.
सखींकडून कलागुणांची उधळण
सखी महोत्सवाच्या या शानदार सोहळ्यात सखी सदस्यांसाठी एकल, समूहनृत्य व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सहभागी सखींनी उत्कृष्टरित्या कला कौशल्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अनेक सखी स्पर्धकांनी अप्रतिम नृत्य सादर केले.
आज बालकांच्या स्पर्धा व समारोप
१८ फेब्रुवारी रविवारीला विद्यार्थी व बालकांसाठी मॅजीक शो व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी सखी व बाल महोत्सवाचा समारोप होणार आहे. गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.

Web Title: Sakhi Forum is the women's progress movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.