१२०० ग्रामसभांना तेंदू विक्रीत फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:56 PM2018-04-25T23:56:43+5:302018-04-25T23:56:43+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांची अर्थव्यवस्था अवलंबून असलेला तेंदू संकलन हंगाम यंदा कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे लांबणीवर पडला आहे. परिणामी पेसा क्षेत्रातील ग्रामसभा अडचणीत सापडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांची अर्थव्यवस्था अवलंबून असलेला तेंदू संकलन हंगाम यंदा कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे लांबणीवर पडला आहे. परिणामी पेसा क्षेत्रातील ग्रामसभा अडचणीत सापडल्या आहेत. १ हजार २३७ ग्रामसभांपैकी केवळ सात ग्रामसभांच्या तेंदू युनिटची लिलाव प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून या तेंदू युनिटची विक्री झालेली आहे. अद्यापही तब्बल १ हजार २३० ग्रामसभांचे तेंदू युनिट अविक्रीत राहिले असल्याची माहिती जि.प.च्या सूत्रांकडून मिळाली आहे.
पेसा क्षेत्रांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ३६३ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये एटापल्ली तालुक्यात ३१, सिरोंचा तालुक्यात ३९, कुरखेडा ४४, कोरची २९, देसाईगंज ९, आरमोरी १७, गडचिरोली २६, धानोरा ६१, चामोर्शी ३८, मुलचेरा ११, अहेरी ३९ व भामरागड तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. २०१८ या वर्षात तेंदू संकलन करण्याबाबतचा ठराव १ हजार २२५ ग्रामपंचायतीने ग्रामसभेत पारीत करून सदर ठराव जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर केला आहे. एकूण ५४ ग्रामपंचायतींनी पर्याय १ ची निवड केली आहे. या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील तेंदू युनिटची लिलाव प्रक्रिया वन विभाग करणार आहे. त्याअनुषंगाने वन विभागाचे प्रयत्नही सुरू आहेत. पेसा क्षेत्रातील ८९० ग्रामपंचायतींनी पर्याय २ ची निवड करून तेंदू संकलनाचा निर्णय घेतला आहे. तसेच वनहक्क कायद्यान्वये २८१ ग्रामपंचायतींनी पर्याय २ ची निवड तेंदू संकलनासाठी केली आहे. जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील ६६ ग्रामपंचायतींनी तेंदू संकलन करण्याबाबतचा प्रस्ताव तसेच ठराव पारित केला नाही. प्रस्ताव जि.प. प्रशासनाकडे सादरही करण्यात आले नाही. मात्र या ग्रामपंचायतीसुध्दा तेंदू संकलनाचे काम यंदा करण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने ग्रामसभांचे पदाधिकारी पुढाकार घेत असल्याची माहिती आहे. कुरखेडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात जंगल नसल्याबाबतची माहिती संबंधित ग्रामपंचायतीने जि.प.ला दिली आहे. भामरागड तालुक्याच्या पेसा क्षेत्रातील सहा ग्रामपंचायतीमधील गावे अतिदुर्गम भागात समाविष्ट आहेत. त्यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून तेंदू संकलनाचे काम करणे कठीण आहे. त्यामुळे येथे तेंदू संकलनाचे काम होणार नसल्याची बाबत संबंधित ग्रामपंचायतींनी जि.प.कडे सादर केलेल्या प्रस्तावात नमूद आहे.
कंत्राटदारांनी तेंदू युनिटच्या लिलाव प्रक्रियेमुळे यंदा पाठ फिरविल्यामुळे अनेक ग्रामसभांचे तेंदू युनिटची अद्यापही विक्री झाली नाही. त्यामुळे ग्रामसभा व कंत्राटदाराच्या काय अडचणी आहेत. हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २३ एप्रिल रोजी सोमवारला ग्रामसभांच्या पदाधिकाºयांची तेंदू लिलाव प्रक्रियेबाबत नियोजन विभागाच्या कार्यालयात कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी व उपवनसंरक्षक उपस्थित होते. गतवर्षीपेक्षा यंदा कंत्राटदाराकडून कमी दर मिळाला तरी तेंदू युनिट द्यावे, असा सल्ला देण्यात आला.
या ग्रामसभांच्या तेंदू युनिटची विक्री
पेसा क्षेत्रातील देसाईगंज तालुक्यातील पाच ग्रामसभांची तेंदू लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून तेंदू युनिटची विक्री झाली आहे. तसेच आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी (कोकडी) या दोन ग्रा.पं.ची लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदाराने तेंदू युनिट खरेदी केले. तेंदू युनिटची विक्री झालेल्या देसाईगंज तालुक्यातील पाच ग्रामसभांमध्ये पिंपळगाव, विहीरगाव, डोंगरगाव, शिवराजपूर, कसारी आदींचा समावेश आहे. सदर ग्रामसभांना कंत्राटदाराकडून ६०० ते ६५० रूपये प्रती गोणी असा दर मिळाला आहे.