'सॅल्यूट' वो तुम्हाला! शहीद पतींचे पार्थिव गावात येताच पत्नींकडून मानवंदना, अवघा महाराष्ट्र हळहळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 09:09 PM2019-05-02T21:09:37+5:302019-05-02T21:10:56+5:30
वीरमरण आलेल्या जवानांना मानवंदना देताना त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या एका कृतीने संपूर्ण गडचिरोली गहिवरून गेली आहे.
गडचिरोली - जांभूरखेडा येथील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील शहीद जवानांना पोलीस विभाग आणि मुख्यमंत्र्यांकडून मानवंदना देण्यात आली. त्यांनंतर, या जवानांचे पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावी पोहोचले आहे. आपल्या गावच्या भूमिपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी अख्ख गाव वाटेकडे डोळे लावून बसले होते. तर, गडचिरोलीतशहीद जवानांचे पार्थिव गावात पोहोचताच, वीरपत्नी आणि नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला. मात्र, या दु:खाच्या परिस्थितीतही वीरपत्नींनी सॅल्यूट करुन आपल्या शहीद पतीला मानवंदना दिली.
वीरमरण आलेल्या जवानांना मानवंदना देताना त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या एका कृतीने संपूर्ण गडचिरोली जिल्हा गहिवरुन गेला आहे. आपल्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर बाजूला सारत वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नींनी सॅल्यूट मारत साश्रू-नयनांनी जवानांना मानवंदना दिली. या वीरपत्नीच्या कृतीन उपस्थितांचे मन हेलावले तर अनेकांच्या डोळ्यात टकचन पाणी आले. आपला आयुष्याचासोबती, आपला जीवनसाथी, आपल्या मुलांचा बाप आणि ज्यासोबत 7 जन्माची गाठ बांधल्याची शपथ घेतली असा नवरा आज आपल्याला सोडून गेला. तरीही डोळ्यांतून कोसळणाऱ्या पाणाऱ्या धारांसोबतच या वीरपत्नीचे हात आपल्या कपाळाकडे वळले. नकळत, तोंडातून जयहिंदचा जयघोष देत आपल्या शहीद पतीला सॅल्यूट या महिलांनी केला. या धाडसी आणि शौर्याचे चित्र पाहून सोशल मीडियाही हेलावून गेला आहे. काळजाचं पाणी करणाऱ्या या एका क्षणाने अनेकांचे डोळे पाणावले.
जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचं पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 4 जवानांना वीरमरण आले असून भंडारा जिल्ह्यातील तिघे शहीद झाले आहेत.