सॅल्यूट ! जीवाची बाजी लावून नक्षल्यांशी लढले, राष्ट्रपती पदकाने आयुष्याचे सोने झाले

By संजय तिपाले | Published: August 14, 2024 03:33 PM2024-08-14T15:33:29+5:302024-08-14T15:36:58+5:30

गडचिरोली पोलिसांचे शौर्य: १७ पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदक जाहीर

Salute! they fought with the Naxalites at the risk of their lives, awarded with President's medal | सॅल्यूट ! जीवाची बाजी लावून नक्षल्यांशी लढले, राष्ट्रपती पदकाने आयुष्याचे सोने झाले

Salute! they fought with the Naxalites at the risk of their lives, awarded with the President's medal

गडचिरोली : अतिशय खडतर परिस्थितीत जीवाची बाजी लावून नक्षल्यांशी दोन हात करत शौर्य गाजविणाऱ्या १७ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले आहे, तर एका पोलिस अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक घोषित झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही आनंदवार्ता आली. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

देशभरातील पोलिस दलात तसेच सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा राष्ट्रपतींनी देशभरात एकूण २०८ पोलिस शौर्य पदक व ६२४ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर केले असून, त्यापैकी गडचिरोली पोलिस दलास १७ पोलिस शौर्य पदक व  गुणवत्तापुूर्ण सेवेसाठी एक पदक जाहीर झाले आहे. 

हे ठरले पदकाचे मानकरी... 
गडचिरोलीत अपर पोलिस अधीक्षक म्हणून सेवा बजावलेले व सध्या वाशिमचे पोलिस अधीक्षक असलेले अनुज तारे, उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, सहायक निरीक्षक राहुल  देव्हडे, उपनिरीक्षक दीपक औटे, विजय सपकाळ, हवालदार महेश मिच्चा, कोतला कोरामी, नागेशकुमार मादरबोईना, समय्या आसम, महादेव वानखेडे, विवेक नरोटे, मोरेश्वर पोटावी, अंमलदार कोरके वेलादी, कैलास कुळमेथे, शकील शेख, विश्वनाथ पेंदाम यांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक मिळाले असून, उपनिरीक्षक मधुकर नैताम यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहे. शहीद उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांना मरणोत्तर शौर्य पदक जाहीर झाले आहे. 
 

कापेवंचातील दोन, मोरमेट्टातील एका चकमकीतील शौर्याची दखल

सन २०१७ मध्ये मौजा कापेवंचा-कवठाराम, सन २०१९ मध्ये  मोरमेट्टा व सन २०२२ मध्ये कापेवंचा-नैनेर येथे झालेल्या पोलिस- माओवादी चकमकीमध्ये एकूण चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले होते. वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन  राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले.
 

९६ जणांना पदोन्नतीची बक्षिसी
 यासोबतच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला ४१ हवालदारांना सहाय्यक फौजदारपदी व ५५ पोलीस नाईक अंमलदार यांना पोलिस हवालदार पदी पदोन्नती मिळाली आहे.  राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक प्राप्त व पदोन्नती प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल   यांनी कौतुक केले आहे.

चार वर्षांत दोनशेवर अधिकारी- कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक
यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला १८ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक व १ पोलिस अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले होते. २०२४ मध्ये एकूण ३५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना  राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक व २ अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे. मागील चार वर्षांत    जिल्हा पोलिस दलास एकूण ३ शौर्य चक्र, २०३ पोलिस शौर्य पदक व  गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ८ पदक प्राप्त झाले आहे.

Web Title: Salute! they fought with the Naxalites at the risk of their lives, awarded with President's medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.