राष्ट्रसंतांचे विचार रूजतील तोच सुदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:02 AM2018-02-01T00:02:12+5:302018-02-01T00:02:48+5:30
ग्रामसभेला वनहक्क मिळवून देण्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि आपल्या आगळ्या कार्यशैलीने दिल्लीपर्यंत ओळख निर्माण करणाऱ्या मेंढा-लेखा या गावात रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर झाला.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामसभेला वनहक्क मिळवून देण्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि आपल्या आगळ्या कार्यशैलीने दिल्लीपर्यंत ओळख निर्माण करणाऱ्या मेंढा-लेखा या गावात रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर झाला. पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराजांनी ५०-६० वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही किती शाश्वत आहेत याचा प्रत्यय श्रोत्यांना आला.
बडेजावपणाला फाटा देत अगदी साध्या पद्धतीने झालेल्या संमेलनात खऱ्या अर्थाने ग्रामगीतेतील विचार-आचार येथे एकत्रितपणे पहायला मिळाले. मेंढ्यातील गावकऱ्यांसोबत युवा वर्गाने संमेलनाला आवर्जुन लावलेली हजेरी ही बाब कौतुकास्पदच नाही तर भविष्याचे आशादायी चित्र दाखविणारी ठरली. एरवी राष्ट्रसंतांचे भजन, गुरूदेवभक्तांचा कार्यक्रम म्हटले की वृद्धत्वाकडे वळलेली आणि भगव्या टोप्या घातलेली मंडळी नजरेसमोर येते. पण हे संमेलन त्यासाठी अपवाद ठरले. राष्ट्रसंतांच्या विचारांची परंपरा पुढे चालवायची असेल आणि त्यातून उद्याच्या समृद्ध भारताचे स्वप्न पहायचे असेल तर ही धुरा युवकांनीच खांद्यावर घेतली पाहीजे ही संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वरदादा रक्षक यांची तळमळ होती. त्यातूनच त्यांनी पहिल्या दिवशी काही महाविद्यालयांमध्ये जाऊन संमेलनाचा येण्याची गळ विद्यार्थ्यांना घातली. संमेलनाची गर्दी वाढविण्यासाठी नाही तर युवा वर्गातील सध्याच्या सर्वात मोठ्या बेरोजगारीच्या समस्येपासून तर इतर अनेक गोष्टींवर राष्ट्रसंतांचे विचार कसे पर्याय ठरू शकतात हे सांगितले. त्यामुळे युवा वर्गही प्रभावित झाल्याचे दिसून आले.
‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे’ अशा राष्ट्रभक्तीपर भजनांसह गाव, समाज स्वयंपूर्ण व समृद्ध करण्यासाठी गावालाच सर्वाधिकार देण्याची, अर्थात ‘गावगणराज्या’ची संकल्पना तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. ती संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी राष्ट्रसंतांचे अनुयायी आणि सहकारी स्व.तुकारामदादा गीताचार्य यांनी आयुष्यभर अविरत लढा दिला. त्या लढ्याची कथा शब्दरूपाने एकत्रितपणे मांडणाºया ‘लढा गावगणराज्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशनही या संमेलनात झाले. परिसंवादाच्या रूपाने ज्या वक्त्यांनी ‘तुझं गावच नाही का तिर्थ...’ असे म्हणत आपल्या गावावर प्रेम करण्याचा, गावाच्या भल्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचा आणि त्यातून मिळत असलेल्या समाधानाचा उहापोह या व्यासपीठावरून केला ते राष्ट्रसंतांचे अनुयायीच होते. पण ज्या श्रोत्यांनी या संमेलनाला हजेरी लावली त्यांना राष्ट्रसंतांची नव्याने ओळख झाली यात मात्र शंका नाही. त्यांचे विचार युवा पिढीत रूजतील तोच खºर्या अर्थाने सुदिन म्हणावा लागेल.