रेती अवैधरीत्या उत्खनन करणारे नऊ ट्रॅक्टर पकडले
By admin | Published: May 23, 2016 01:28 AM2016-05-23T01:28:00+5:302016-05-23T01:28:00+5:30
मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी पुलखल येथील वैनगंगा नदी घाटावर
तहसीलदारांची कारवाई : ४८ हजारांचा दंड वसूल; महसूल कर्मचाऱ्यांनी रात्रभर केली गस्त
गडचिरोली : मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी पुलखल येथील वैनगंगा नदी घाटावर धाड टाकून रेतीचे अवैधरीत्या उत्खनन करणारे नऊ ट्रॅक्टर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पकडले. या ट्रॅक्टरधारकांकडून त्यांनी एकूण ४८ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.
गडचिरोलीनजीकच्या पुलखल येथील वैनगंगा नदी घाटावर गेल्या अनेक दिवसांपासून रेतीचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक होत होती. याबाबतची माहिती तहसीलदार भोयर यांना मिळाली. या आधारे तहसीलदार भोयर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह शनिवारी रात्री पुलखल नदी घाटावर धाड टाकली. त्यांनी रात्री जागून काढली. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास येथून त्यांनी रेतीचे अवैधरीत्या उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर जप्त केले. यातील काही ट्रॅक्टर रिकामे होते. तर काही ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेती भरण्यात आली होती. तहसीलदार भोयर यांनी ट्रॅक्टरधारकांकडून एकूण ४८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला. रेतीचे अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक करणारे या प्रकरणातील ट्रॅक्टर कनेरी व कोटगल येथील असल्याची माहिती आहे. इतर रेतीघाटावरूनही अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन व वाहतूक केल्या जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
तीन दिवसात
१७ कारवाया
गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून अवैधरीत्या रेती, गिट्टी व इतर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या १७ वाहनधारकांवर कारवाई केली. या वाहनधारकांकडून एकूण १ लाख २८ हजार रूपयांचा दंड वसूल केला. तहसीलदारांच्या या कारवाईमुळे कंत्राटदाराचे धाबे दणाणले आहेत.