रेती उपशाने पुलाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:26+5:30
सोडे नदीची रेती अतिशय चांगली आहे. त्यामुळे या रेतीची विशेष मागणी असल्याने रेती तस्कर याच नदीतून रेतीची चोरी करीत आहेत. रेती चोरलेल्या पात्राची पाहणी केल्यस पाचशेपेक्षा अधिक ब्रॉस रेतीची चोरी झाली आहे, असे दिसून येईल. एवढेच नाही तर अगदी पुलाच्या पिलरपर्यंत खड्डा पाडला आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या धानोरा-रांगी मार्गावरील सोडे नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे, रेती तस्करांनी पुलाच्या पिलरपर्यंत जवळपास चार फूट खोलपर्यंत रेती उपसली आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झालाा आहे. महसूल विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाळू उपसा धोरणानुसार ३० सप्टेंबर रोजी मागील वर्षीच्या लिलावाची मुदत संपली. अजूनपर्यंत रेती घाटांचे नवीन लिलाव झाले नाही. पावसाळा संपल्यानंतर घर, पूल, रस्ते व इतर शासकीय इमारतींच्या बांधकामांना वेग आला आहे. त्यामुळे रेतीची मागणी वाढली असताना रेतीची वाहतूक करण्यावर बंदी आहे. घराचे काम ठप्प राहू नये, यासाठी पाहिजे तेवढी किंमत मोजायला घर मालक व कंत्राटदार तयार आहेत. याचा फायदा रेती तस्करांनी उचलण्यास सुरूवात केली आहे. रात्रीच्या सुमारास तर कधीकधी भरदिवसा सुध्दा रेती तस्करी केली जात आहे. जवळपास तीन ते चार हजार रुपये प्रती ट्रॅक्टर दराने रेती विकली जात असल्याने पैशाची लालच रेती तस्करांनी लागली आहे. रेती तस्करी करताना ट्रॅक्टर आढळून आल्यास १ लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. यालाही न मानता रेती तस्कर रेतीची वाहतूक करीत आहेत.
सोडे नदीची रेती अतिशय चांगली आहे. त्यामुळे या रेतीची विशेष मागणी असल्याने रेती तस्कर याच नदीतून रेतीची चोरी करीत आहेत. रेती चोरलेल्या पात्राची पाहणी केल्यस पाचशेपेक्षा अधिक ब्रॉस रेतीची चोरी झाली आहे, असे दिसून येईल. एवढेच नाही तर अगदी पुलाच्या पिलरपर्यंत खड्डा पाडला आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेती निघून गेल्यास पुलाचा पिलर कोसळण्याचा धोका असल्याने नदी घाटाचा लिलाव करताना पुलाजवळ रेती उपसू दिली जात नाही. रेती चोरट्यांनी मात्र पिलरपर्यंत रेतीचा उपसा केला आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
गडचिरोलीतील रेतीची तस्करी वाढली
गडचिरोली : गडचिरोली शहरात बांधकामांना वेग आला आहे. मात्र रेतीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. बांधकाम ठप्प पडू नये, यासाठी घर मालक अधिकची किंमत देण्यास तयार असल्याने रात्रीच्या सुमारास जवळपासच्या नदी पात्रामधून रेती चोरून आणत आहेत. रात्री महसूल कर्मचारी पाळत ठेवू शकत नाही. ही बाब रेती तस्करांना माहित असल्याने रात्रीच्या सुमारास रेती चोरली जात आहे. रेतीची तस्करी होऊ नये, यासाठी महसूल विभाग प्रयत्न करीत असला तरी त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
वर्दळीचा मार्ग
धानोरा-रांगी हा अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गाने तलाठी, मंडळ अधिकारी व इतर कर्मचारी नेहमीच प्रवास करतात. असे असतानाही शेकडो ब्रॉस रेती चोरली असताना या अधिकाऱ्यांच्या आजपर्यंत कसे काय लक्षात आले नाही. महसूल विभागाच्या अधिकाºयांना काही टक्का हिस्सा आम्ही देतो. त्यामुळे ते आमच्यावर कोणतीच कारवाई करू शकत नाही, असे रेती तस्कर खुलेआम सांगत आहेत. विशेष म्हणजे, अगदी वर्दळीच्या मार्गावरून रेती चोरी होत असतानाही कारवाई होत नसल्याने रेती तस्करांच्या बोलण्यात सत्यता असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, सोडे नदी पात्राचा कधीच लिलाव होत नाही. त्यामुळे जेवढा खड्डा पाडल्या गेला आहे, तेवढ्या खड्ड्यातील संपूर्ण रेती चोरून नेण्यात आली आहे. यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लागला आहे.