संजय गंडाटे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित

By admin | Published: January 7, 2017 01:25 AM2017-01-07T01:25:51+5:302017-01-07T01:25:51+5:30

गडचिरोली प्रेसक्लबतर्फे शुक्रवारी पत्रकार दिनी गडचिरोली जिल्ह्यातील मोती उत्पादक शेतकरी संजय गंडाटे यांना

Sanjay Gandte honored with District Gaurav Award | संजय गंडाटे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित

संजय गंडाटे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित

Next

गडचिरोली : गडचिरोली प्रेसक्लबतर्फे शुक्रवारी पत्रकार दिनी गडचिरोली जिल्ह्यातील मोती उत्पादक शेतकरी संजय गंडाटे यांना गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, भाजप नेते प्रमोद पिपरे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेसक्लबचे अध्यक्ष सुरेश नगराळे होते. या कार्यक्रमात मोती उत्पादक शेतकरी संजय गंडाटे यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रेसक्लबच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले की, पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार सातत्याने करीत असतात. दबलेली एखादी महत्त्वपूर्ण गोष्ट लोकांपुढे आणून संबंधित अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी तत्परतेने बजाविलेली आहे. खासदार, आमदार म्हणून आम्ही जिल्हा विकासासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत पत्रकारांनीही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला तळागाळातील घटनांची माहिती मिळते. पत्रकार हे सर्व क्षेत्राशी संबंधित असल्याने समस्यांची जाण त्यांना चांगल्या प्रकारे असते, असे ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर म्हणाले, गडचिरोलीतील पत्रकारांनी शासनाच्या पुरस्कार योजनेत अधिकाधिक संख्येने सहभाग घ्यावा. शासनदरबारी त्यांना ओळख देण्यासाठी माझे सहकार्य नेहमीच राहिल. गडचिरोलीतच खरा भारत आहे. या जिल्ह्यातील लोक चांगल्या स्वभावाचे आहेत. असे दैठणकर म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना संजय गंडाटे म्हणाले, लहानपणापासूनच काही तरी वेगळे करण्याची माझी इच्छा होती. गडचिरोलीतील पत्रकारांनी मला प्रसिध्दी दिल्यामुळे माझ्याकडे आता दूरवरून अनेक शेतकरी येत आहे. माझ्या यशाचे श्रेय पत्रकारांना देतो, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन जयंत निमगडे व प्रास्ताविक नंदकिशोर काथवटे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Sanjay Gandte honored with District Gaurav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.