कोरडवाहू शेतीला संजीवनी
By admin | Published: October 30, 2015 01:42 AM2015-10-30T01:42:37+5:302015-10-30T01:42:37+5:30
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वन परिक्षेत्रात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोदतळी निर्माण करण्यात आल्याने या भागातील कोरडवाहू जमिनीला नवसंजीवनी मिळाली आहे.
देलनवाडी वनपरिक्षेत्र : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मिळाली शेतकऱ्यांना पर्वणी
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वन परिक्षेत्रात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोदतळी निर्माण करण्यात आल्याने या भागातील कोरडवाहू जमिनीला नवसंजीवनी मिळाली आहे. या भागातील धान पीक पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर होते. परंतु अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या खोदतळ्यांमुळे धान पिकाला वन विभागाने एक प्रकारची पर्वणीच दिली आहे.
देलनवाडी वनपरिक्षेत्रातील कढोली गावालगतच्या जंगलात शेतालगत वनविभागाच्या वतीने खोदण्यात आलेल्या खोदतळ्याने दुष्काळाच्या परिस्थीतत पाणी मिळाल्याने या परिसरातील धानपिकाला दिलासा मिळाला आहे. देलनवाडी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी अनिल साळवे यांनी स्वत: जंगलाच्या भूभागाचे सर्वे करून खोदतळे बांधण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. कढोली परिक्षेत्रात सहा खोदतळी खोदण्यात आली. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे तलाव व बोडी अपूर्ण भरल्या होत्या. सदर जलसाठे पीक निघण्यापूर्वीच कोरडे पडले. मात्र कढोली येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या वतीने खोदलेल्या खोदतळ्यांच्या पाण्याचा वापर करून धान पीक वाचविले आहे. त्यामुळे हातून गेलेले धानपीक वाचले आहे. सध्य:स्थीतीत खोदतळे रिकामे झाले असले तरी पाऊस आल्यानंतर सदर खोदतळे भरून उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागविणार आहेत. त्यामुळे सदर खोदतळे शेतकऱ्यांबरोबरच वन्यप्राण्यांनाही नवसंजिवणी देणारे ठरले आहे. या खोदतळ्यांमुळे भूजल पातळीतही वाढ होण्यास फार मोठी मदत झाली आहे. याबाबत कढोली येथील शेतकरी सूरज चौधरी, महादेव सहारे, युवराज ठाकरे यांनी वन विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)