खोदतळे व पाणवठ्यांमुळे संजीवनी
By admin | Published: June 4, 2017 12:43 AM2017-06-04T00:43:21+5:302017-06-04T00:43:21+5:30
उन्हाळ्यात जंगलांना लागणारे वनवे आणि वनक्षेत्रातील पाण्याचे स्रोत आटले म्हणजे वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेतात.
सिर्सी उपक्षेत्र : वनपरिक्षेत्रातील ११ खोदतळे व १३ पाणवठ्यात उन्हाळ्यातही पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : उन्हाळ्यात जंगलांना लागणारे वनवे आणि वनक्षेत्रातील पाण्याचे स्रोत आटले म्हणजे वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेतात. प्रसंगी पाळीव प्राण्यासह मानवाचाही बळी घेतात. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिर्सी उपक्षेत्रात वन विभागाने ११ खोदतळे व १३ पाणवठ्यांची निर्मिती केली. परिणामी भर उन्हाळ्यातही याठिकाणी पाणी आहे. त्यामुळे या भागातील वन्यजीवांना नवसंजीवनी मिळाली आहे.
फेब्रुवारी, मार्च महिन्यात मोहफूल संकलनासाठी काही व्यक्ती झाडाखालील पालापाचोळा जमा करून त्याच ठिकाणी जाळतात व घरी निघून येतात. ही आग जंगलात पसरते. पुढे वनवे रौद्ररूप धारण करून संपूर्ण जंगलात विस्तारतो. या आगीत वन्यजीव तडफडून मरतात किंवा मोकळ्या जागेचा आश्रय घेतात. या ठिकाणीही मानवाकडून वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. हे कृत्य टाळण्यासाठी सिर्सी वन विभागातील कर्मचाऱ्यांनी मोहफूल वेचणाऱ्या लोकांना मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा जाळू दिला नाही. झाडाखालील पालापाचोळा झाडून तो बाजुला करण्यास सांगितले व दाट जंगलात ठिकठिकाणी १३ पाणवठे तयार करून त्यामध्ये मजुरांकरवी नियमित पाणी टाकण्यात आले. पोर्ला वनपरिक्षेत्रात ११ खोदतळ्यात उन्हाळभर जलसाठा असल्याने या भागातील वन्यजीवांना पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली व उपक्षेत्रातील वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारचा धोका झाला नाही.
वन विभागाच्या वतीने सिर्सी उपक्षेत्रात पूर्वीच उपाययोजना करण्यात आल्या. याचा लाभ वन्यप्राण्यांना झाला. शिवाय मानवासाठीही लाभदायक ठरला. भर उन्हाळ्यातही येथील जलसाठ्यांमध्ये पाणी असल्याने वन्यप्राण्यांना संजीवनी मिळाली आहे. वन विभागाच्या उपक्रमाबद्दल सिर्सी उपक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.
अनेक प्रजातींच्या प्राण्यांचा वावर
पोर्ला वनपरिक्षेत्रातील सिर्सी उपवन क्षेत्रात दाट व झुडूपी जंगल आहे. या जंगलात लहान टेकड्या व नाल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या भागात बिबट, अस्वल, नीलगाय, सांबर, हरीण, ससे, लांडगे, कोल्हे यासह विविध प्राण्यांचा वावर आहे. या वन्य प्राण्यांसाठी जंगलात पाणवठे व खोदतळे असल्याने प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत नाही. पोर्ला, वसा, चुरमुरा, किटाळी, देऊळगाव, इंजेवारी, देलोडा, बोरी, आदी गावातील परिसरात जंगल व्यापले आहे. त्यामुळे हा परिसर विस्ताराने मोठा आहे. विशेषत: झुडूपी जंगल असल्याने वन्यप्राण्यांसाठी सोयीचा आहे. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे.