रस्ता कामासाठी सर्रास वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:01 PM2018-12-26T22:01:16+5:302018-12-26T22:01:32+5:30
रवी रामगुंडेवार। लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत यावर्षी तालुक्यात प्रथम अनेक रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या ...
रवी रामगुंडेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत यावर्षी तालुक्यात प्रथम अनेक रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामावर पोकलँड, जेसीबी, ट्रॅक्टरचा वापर करून घनदाट राखीव जंगलातून गौण खनिज तसेच नाल्यातील रेती, मुरूम, माती, दगड व गिट्टीचे अवैधरित्या खनन सुरू आहे. यासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वनकर्मचाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
संपूर्ण एटापल्ली तालुका घनदाट जंगलांनी व्यापलेला असून तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र वनविभागाच्या हद्दीत येते. तालुक्यात १९७ गावे असून अनेक लहान गावे घनदाट जंगलात वसलेली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामासाठी गौण खनिजाचे या भागात अवैध खनन सुरू आहे. परिणामी लाखो रूपयांच्या शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. तसेच अनेक महिने आपल्या क्षेत्रात हे अधिकारी व कर्मचारी जाऊन पाहणी करीत नसल्याने आपल्या हद्दीतील जंगलात काय सुरू आहे, याची साधी माहितीसुद्धा वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना नाही.
भामरागड वनविभागाअंतर्गत वनपरिक्षेत्र एटापल्लीच्या हद्दीतील देवदा उपकेंद्र बिट गट्टेपल्ली कुप नं.२४३, २४४ या क्षेत्रातील राखीव जंगलातून हालेवारा-वट्टेगट्टा-गट्टेपल्ली या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे. सदर रस्ता कामासाठी डझनभर पोकलँड व जेसीबीच्या सहाय्याने शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. मुरूमासाठी तीन मोठे खड्डे खोदून मुरूम काढण्यात आले. हालेवारा-वट्टेगट्टा-गट्टेपल्ली या १० किमी रस्त्याच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराने इतर राज्यातील तब्बल १० पोकलँड व पाच जेसीबी वाहने कामावर आणली आहेत. परप्रांतीय मजूर लावून पाच दिवसांच्या कालावधीत रात्रंदिवस काम करून सदर रस्त्याचे मातीकाम पूर्ण करण्यात आले.
सदर मार्ग पूर्वी अरूंद व कच्चा होता. या मार्गाच्या दोन्ही बाजूस घनदाट राखीव जंगल आहे. संबंधित कंत्राटदाराने या रस्ता कामाची कुठलीही माहिती वनविभागाला दिली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेसीबी व पोकलँडच्या सहाय्याने मोठी नाली खोदून त्यातील मुरूम रस्त्यावर टाकले. या कामात अनेक झाडे तोडल्या गेली. नाली खोदकामात शेकडो मोठ्या झाडांचे मूळ बाहेर निघाले असल्याने ही झाडे पाऊस व वादळाने कोसळण्याची शक्यता आहे. याच रस्त्यावर परत मुरूम टाकण्यासाठी हालेवारा-वट्टेगट्टादरम्यान रस्त्याच्या थोड्या अंतरावर जंगलात मुरूमासाठी तीन मोठ्या खाणी तयार करण्यात आल्या आहेत.
सदर रोडकाम परवानगी संदर्भात विचारणा केली असता, एटापल्लीचे नियमित व प्रभारी या दोन्ही वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे समजले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मी प्रशिक्षणाकरिता गेलो असल्याने माझा प्रभार दुसºया वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्यामुळे याबद्दल मला माहिती नाही. तरी पण चौकशी करून कारवाई करू.
- संजूदास राठोड, वनपरिक्षेत्राधिकारी, एटापल्ली
वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचा प्रभार आपण नुकताच चॉर्जपूर्वीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडे दिला आहे. रोड कामाची परवानगीबाबतचे कुठलेच कागदपत्र आमच्या कार्यालयात नाही.
- सुहास पाटील, प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी, एटापल्ली