सरपंचांना ओळखपत्र मिळण्यास विलंब
By admin | Published: April 17, 2017 01:39 AM2017-04-17T01:39:19+5:302017-04-17T01:39:19+5:30
सरपंचांना विविध कामांसाठी अनेक प्रशासकीय विभागांकडे जावे लागते. त्यांची स्वत:ची ओळख व्हावी,
बीडीओ यांना निवेदन : महिला राजसत्ता आंदोलनतर्फे आंदोलनाचा इशारा
गडचिरोली : सरपंचांना विविध कामांसाठी अनेक प्रशासकीय विभागांकडे जावे लागते. त्यांची स्वत:ची ओळख व्हावी, यासाठी सरपंचांना ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी महिला राजसत्ता आंदोलनातर्फे संवर्ग विकास अधिकारी यांच्या मार्फतीने शासनाकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संरचनेमधील ग्राम पंचायत हा शेवटचा घटक असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. ग्राम पंचायतीमध्ये महिलावर्ग सरपंच पद सांभाळत आहेत. सरपंचाची जबाबदारी स्वीकारलेल्या महिलांना विविध शासकीय कामांसाठी शासनाच्या विविध विभागांकडे जावे लागते. सरपंचाची ओळख पटविण्यासाठी त्याच्याकडे ओळखपत्र देण्याबाबतचा आदेश शासनाने १७ फेब्रुवारी २०१४ रोजी काढला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे सरपंचांना ओळखपत्रांचे वेळेवर वाटप होत नसल्याचे दिसून येत आहे.
ओळखपत्र देण्यात यावे, अन्यथा पंचायतराज दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील महिला सरपंचांनी २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन केले होते. याच प्रश्नासाठी ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव, राज्याचे अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, पंचायतराज समितीच्या राज्य महिला आयोग यांना भेटून निवेदन दिल्यानंतर सर्व पंचायत समित्यांना ओळखपत्र देण्याबाबत कळविले होते. त्यानुसार काही पंचायत समित्यांनी ओळखपत्राचे वितरण केले आहे. मात्र काही पंचायत समित्या याकडे दुर्लक्ष केले आहे.
महिलाराज सत्ता आंदोलनाच्या वतीने गडचिरोली, आरमोरी, धानोरा या पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ओळखपत्र देण्याबाबतची मागणी केली आहे. ओळखपत्र न दिल्यास २४ एप्रिल रोजी होणाऱ्या पंचायतराज दिनाच्या दिवशी आंदोलनाचा इशारा गडचिरोली जिल्हा संघटीका ज्योती मेश्राम, आरमोरी तालुका संघटीका अर्चना जनगनवार, गडचिरोली तालुका संघटीका ममता शिवणकर, धानोरा तालुका संघटीका मनीषा मडावी, गुरूदास सेमस्कर, मंजूषा दोनाडकर यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)