मित्राला वाचविले; पण डॉक्टर स्वत: बुडाले, आलापल्लीच्या डॉक्टरचा तेलंगणात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:40 PM2023-10-16T12:40:06+5:302023-10-16T12:40:50+5:30
१५ ऑक्टोबरला विकेंड साजरा करण्यासाठी ते मित्र व कुटुंबासमवेत महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील तेलगंणाच्या सिपेली गावात गेले
आलापल्ली (गडचिरोली) : धबधब्याखाली निसर्ग पर्यटनाचा आनंद घेताना बुडालेल्या मित्राला वाचविण्यासाठी डॉक्टर गेले, मित्राला हिमतीने वाचविलेही; पण खोल पाण्यात बुडून दुर्दैवाने ते स्वत:च बुडाले. १५ ऑक्टोबरला तेलंगणातील सिपेली येथे ही घटना घडली.
किशोर रावजी नैताम (४६,रा.आलापल्ली, ता. अहेरी) असे मयत डॉक्टरचे नाव आहे. ते पेरमिली (ता. अहेरी) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. १५ ऑक्टोबरला विकेंड साजरा करण्यासाठी ते मित्र व कुटुंबासमवेत महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील तेलगंणाच्या सिपेली गावात गेले. तेथे उंच धबधब्यावरून पाणी कोसळत हाेते. सकाळी ११ वाजता धबधब्याखाली पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा डॉक्टर मित्र पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी डॉ. नैताम यांनी पाण्यात उडी घेतली. मित्राला त्यांनी सुरक्षित बाहेर काढले; पण त्यानंतर ते स्वत:चा बचाव करू शकले नाहीत. त्यांचा बुडून मृत्यू झाला. अहेरी येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे दिला. त्यांच्या पश्चात आई, वडील, डॉक्टर पत्नी सुमती, दोन मुले, दोन भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार आहे.