सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी
By Admin | Published: June 14, 2017 01:46 AM2017-06-14T01:46:09+5:302017-06-14T01:46:09+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात
दहावीचा निकाल ८५.४९ टक्के : नम्रता रायपुरे प्रथम तर चामोर्शीची वैदवी आणि आरमोरीची साक्षी द्वितीय
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात गडचिरोली जिल्ह्याने ८५.४९ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील ६ जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. गडचिरोलीच्या बियाणी विद्यानिकेतन विद्यालयाची नम्रता देवेंद्र रायपुरे हिने ९६.६० गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. जिल्ह्यातून अव्वल स्थानी असणाऱ्या तीनही मुलीच आहेत हे विशेष.
यासोबतच चामोर्शी येथील जा.कृ.बोमनवार विद्यालयाची वैदवी गोपाल सिंगरेड्डीवार आणि आरमोरीच्या हितकारणी विद्यालयाची साक्षी दुर्वास बुद्धे या दोन मुलींनी सारखेच ९५.८० टक्के गुण पटकावून द्वितीय स्थान मिळविले. गडचिरोलीच्या शिवाजी हायस्कूलचा मयूर निळकंठ भांडेकर आणि चामोर्शीच्या कारमेल अकादमीच्या आयुष संतोष सुरावार यांनी ९५.६० टक्के गुण घेऊन तृतीय स्थान मिळविले आहे.
यावर्षी म.रा.माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी गडचिरोली जिल्ह्यातून १६ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार ११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १३ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १ हजार २२५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ५ हजार १५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६ हजार ३४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तालुकानिहाय निकालावर एक नजर टाकल्यास सर्वात चांगला निकाल सिरोंचा तालुक्यात लागला आहे. या तालुक्यातील ८७.५७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर सर्वात कमी (६८.९३ टक्के) निकाल भामरागड तालुक्याचा लागला आहे. या परीक्षेला जिल्ह्यात सर्वात जास्त विद्यार्थी चामोर्शी तालुक्यातून बसले होते. त्यात मुले १५८३ मुले आणि १४११ मुली होत्या.
जिल्हाभरात ३३५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात गडचिरोली शहरातील ६ शाळा असून उर्वरित २९ शाळा ग्रामीण भागातील आहेत हे विशेष. दुपारी १ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला. निकालाची उत्सुकता सर्वांना असल्यामुळे ग्रामीण भागात निकाल पाहण्यासाठी इंटरनेटसह स्मार्टफोनधारकांना चांगला चांगला भाव आला होता.